उपमुख्यमंत्र्यांसमोरच फिजिकल डिस्टन्सचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:57 AM2021-01-04T01:57:43+5:302021-01-04T01:58:22+5:30
कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसताना लोक फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे काटेकोर पालन करताना दिसत नाहीत. गर्दी टाळण्यासाठी लग्नसमारंभातदेखील शंभरपेक्षा अधिक लोक अपेक्षित नाहीत, असे विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फिजिकल डिस्टन्स नियमांचे महत्त्व अधोरेखित केले असताना लग्नसमारंभात मात्र त्यांच्या समक्ष फिजिकल डिस्टन्स नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
नाशिक : कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसताना लोक फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे काटेकोर पालन करताना दिसत नाहीत. गर्दी टाळण्यासाठी लग्नसमारंभातदेखील शंभरपेक्षा अधिक लोक अपेक्षित नाहीत, असे विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फिजिकल डिस्टन्स नियमांचे महत्त्व अधोरेखित केले असताना लग्नसमारंभात मात्र त्यांच्या समक्ष फिजिकल डिस्टन्स नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
रविवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील काेरोना आढावा बैठक आटोपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसल्याचे सांगताना लोक नियमांचे पालन करीत नसल्याची खंत व्यक्त करीत नागरिकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित असल्याची अपेक्षा व्यक्त केली होती. शासकीय बैठक आटोपून अजित पवार हे सायंकाळी शहरात एका बड्या राजकीय नेत्याकडील लग्न-सोहळ्यालाही उपस्थित राहिले. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींचीही सोहळ्याला उपस्थिती होती. अनेक शासकीय अधिकाऱ्यांनीही हजेरी लावली. लग्नसोहळ्यातील गर्दीमुळे कुठेही फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन होत नसल्याचे प्रत्यक्ष उपमुख्यमंत्र्यांसमोरच घडलेले दिसले.
या सोहळ्याला अनेक लोक तर विनामास्क वावरत असताना दिसत होते. सोहळ्याची भव्यता आणि उपस्थित गर्दी पाहता कुणालाही डिस्टन्सच्या नियमांचे काही देणेघेणे नसल्याचे चित्र या ठिकाणी होते. सोहळ्याला येण्यापूर्वी फिजिकल डिस्टन्सची चिंता व्यक्त करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांसमोरच डिस्टन्स नियमाचा फज्जा उडाला. पत्रकार परिषदेतील त्यांचे विधान आणि प्रत्यक्ष गर्दीतील त्यांची उपस्थिती यामुळे सोशल मीडियात चर्चा रंगली.