कोरोना नियमांना केराची टोपली दाखवित सिनेमाप्रेमी मालेगावकरांनी चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर गर्दी केली. ना मास्क, ना सुरक्षित अंतर अशा या हुल्लडबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . या प्रकाराची कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे छावणी पोलिसांना याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले असून संबंधित चित्रपटगृह व्यवस्थापकवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. रात्री उशिरापर्यंत छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. गुन्हेविश्वावरील ‘मुंबई सागा’ चित्रपटाच्या शुक्रवारी सायंकाळच्या ‘शो’ वगळता अनेक सिनेरसिकांनी मास्क परिधान केले नव्हते. तिकीट काढण्यापासून चित्रपटगृहात प्रवेश करण्यासाठी गर्दी झाली. या प्रकाराची स्थानिक व जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली.
चित्रपट गृहे बंद ठेवण्याचा प्रस्ताव
मालेगावी सध्या ८७८ , तर तालुक्यात २१८ कोरोना बाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत १८४ जणांचा मृत्यू झाला आहे. सिनेमागृह, मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्केच व्यक्तींना प्रवेश देण्याचे निर्देश आहेत. शिवाय मास्कविना प्रवेश नाकारणे, प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंगही बंधनकारक केली आहे. या आदेशाला शुक्रवारी वाटाण्याचा अक्षता लावण्यात आल्या. शुक्रवारी सुरू असणारे चित्रपट गृहे बंद ठेवण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर केला जाणार आहे. त्यामुळे चित्रपटगृहात हुल्लडबाजी करणाऱ्याना चाप बसण्याची शक्यता आहे.
फोटो : २० मालेगाव