नाशिक महानगर महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी एक महत्त्वाचे केंद्र आहे. मुंबई, पुणे शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक वेगाने औद्योगिकीकरण विकसित झालेले नाशिक आजही भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या शहरांपैकी एक आहे. रस्ते, रेल्वे, विमानसेवा या उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीमुळे निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही क्षमतांची वृद्धी समतोलपणे साधली गेली आहे. आगामी पाच वर्षांचा विचार केल्यास या पायाभूत सोयी-सुविधांमुळे २०२५ पर्यंत नाशिकला विकासाचे नवीन कोंदण लाभणार आहे. देशात प्रथमच होणाऱ्या टायरबेस मेट्रो प्रकल्पामुळे संपूर्ण देशात नाशिकचे भविष्य अधोरेखित होत असून बंगळुरू, दिल्ली, हैद्राबादसह पाच प्रमुख शहरांना असलेली विमानसेवेची व्यवस्था, नाशिक-पुणे सेमी स्पीड रेल्वे सुविधा, मुंबई -नागपूरला जोडणारा समृध्दी महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जात असल्याने वेगवान आर्थिक विकास होणार आहे. चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड महामार्ग नाशिकमधून प्रस्तावित आहे. वाहतूक सुलभीकरणाकरिता बाह्य (रिंग) रोड अशा बलस्थानांमुळे स्मार्ट होत असलेल्या नाशिकमध्ये कोरोना संकटामुळे 'वर्क फ्रॉम होम'ची आवश्यकता वाढली आहे. त्यामुळेच गृह स्वयंचलीकरण तसेच तंत्रज्ञानावर आधारित सुविधा असलेल्या घरांना मागणी वाढल्याचे मागील सहा ते सात महिन्यांत दिसून आले आहे. विशेषत: नाशिक व उपनगरांतील अनेक भागांत अशा घरांना मोठी मागणी दिसत आहे. आगामी काळात घर खरेदीदारांत महिलांचा तसेच सध्या भाडेकरू असलेल्यांचा कल अधिक असेल. परंतु, त्याचा पसंतीक्रम परवडणाऱ्या घरांसोबतच सर्व सोयी सुविधांना असणार आहे. कोरोना संकटात सुरक्षेच्यादृष्टीने स्वत:चे हक्काचे घर असावे, ही भावना वाढली आहे. त्याचा परिणाम नाशिक विभागात होणाऱ्या बांधकाम बदलांसह नागरिकांच्या जीवनमानावरही होणार असल्यानेे व्यावसायिकांडून प्रामुख्याने समूह निवास व्यवस्थांसह गगनचुंबी इमारती उभारण्यावर भर असणार आहे. अशा गृहप्रकल्पांमध्ये जिम, क्लब हाऊस याठिकाणी कोरोनोसारख्या संकटकाळात तात्काळ बदल करून विलगीकरणाची सोय होऊ शकेल, अशा इमारतीचे आराखडे तयार करताना मूलभूत सोयी-सुविधांची आधुनिक तंत्रज्ञानाधारे उपलब्धता व पूर्तता कशी होऊ शकेल याचाही विचार बांधकाम व्यावसायिकांना करावा लागणार आहे.
नाशिकमध्ये पूर्वी उच्च जीवनमान जगणारे घटकांकरिता ३ ते ४ बेडरूम आवश्यक असणाऱ्या घटकांना २२०० ते २५०० चौरस फुटांची निवास संकुले आकारात येत होती. त्यात बदल होऊन ३ ते ४ बेडरूमकरिता १८०० ते २००० फुटांची तसेच २ बेडरूमची धारण क्षमता १००० ते १२०० फुटांची बदलून २ बेडरूमकरिता ८५० ते १००० प्रतिचौरस फूट अशी नेटके घरांची व्यवस्था साकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे घर घेणाऱ्या कुठल्याही नागरिकांची पार्किंग ही सद्यस्थितीत कळीचा विषय असून यात मोठे बदल प्रस्तावित आहे. एका सदनिकाधारकास साधारणत २ चारचाकी वाहनांकरिता तसेच दुचाकीसाठी ४ अशी प्रशस्त व्यवस्था आकारली जाणार आहे. तसेच पार्किंगसाठी तळमजला, पोडियम पार्किंग, मॅकेनिकल पार्किंग अशी व्यवस्था करणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी तर गच्ची (टेरेस) वर पार्किंग योजना प्रस्तावित करण्याचे नियोजन असल्याने ही आव्हाने बांधकाम व्यावसायिकांना पेलावी लागणार असून नाशिकमधील व्यावसायिक त्यासाठी सक्षम आहेत.
इन्फो-
आयटी क्षेत्राचा विस्तार आणि त्या क्षेत्रात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नाशिकमधील आर्थिक आणि रोजगाराच्या संधींमध्ये तेजी दिसून येत आहे. व्यावसायिक मालमत्ता भाड्याने देण्याचे दर पुणे आणि मुंबईच्या तुलनेत सुमारे ३० ते ४० टक्के कमी आहेत. पुणे आणि मुंबईतील सुमारे १५ टक्के आयटी व्यावसायिक रोजगारासाठी नाशिकला आलेले आहेत. विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे अनेक आयटी कंपन्या नाशिकमध्ये तळ उभारू पाहत आहेत. या आयटी प्रोफेशनर्सच्या वर्क फ्रॉम होमसह विविध गरजांची पूर्तता करणाऱ्या स्वप्नातील घरांची निर्मिती करण्याच्या दिशेने नाशिकचे बांधकाम व्यावसायिक आत्तापासूनच पाऊल टाकत आहेत.
===Photopath===
050421\05nsk_36_05042021_13.jpg
===Caption===
सुनील गवादे