नाशिक : शहरातील २२ मोक्याचे भूखंड बीओटीवर विकसित करण्याचा ठराव जानेवारी महिन्याच्या महासभेत सत्तारूढ भाजपने घुसवला असला तरी त्यावर प्रशासनाने कोणत्याही प्रकारे अंमलबजावणीची भूमिका घेतलेली नाही. यासंदर्भात अभ्यास करून अभ्यास करण्याचे जाहीर करून आयुक्त कैलास जाधव यांनी आस्ते कदम भूमिका स्वीकारली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीला अवघे वर्ष शिल्लक आहे. त्यामुळे भाजपने झटपट निर्णयांची घाई सुरू केली आहे. त्यातून गेल्या महिन्याच्या महासभेत अनेक अशासकीय ठराव घुसवण्यात आले असून त्यात या २२ भूखंडांचा देखील समावेश आहे. शहराच्या सहाही विभागातील भूखंड बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा ठराव कोणालाच माहिती नसून शिवसेनेच्या महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना अन्य ठरावाची माहिती घेताना हा प्रकार आढळला.
शहरातील बी. डी. भालेकर मैदान, गेाल्फ क्लब भांडार, पंचवटी येथील भांडार, महात्मानगर येथील पालिका बाजार तसेच बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राजवळील जलधारा क्वार्टर्स परिसरातील जागा, हिरावाडी कचरा डेपो, गंजमाळ येथील जागा अशा अनेक भूखंडांचा यात समावेश आहे. महापालिकेने केलेल्या ठरावानुसार या जागा देण्याचा निर्णय झाला असला तरी इतक्या मेाठ्या प्रमाणात निर्णय घेण्यापूर्वी कोणतीही चर्चा महासभेत झालेली नाही.
यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी अशा प्रकारच्या भूखंड ठरावाबाबत माहिती नाही. मात्र, अशासकीय ठराव महासभेत झाला असेल तर तो करता येऊ शकतो. तो महापालिकेच्या हिताच्या बाजूने आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर त्याबाबत योग्य तो निर्णय घेता येऊ शकतो, असे ते म्हणाले. बीओटीबाबत निर्णय घ्यायचा झालाच तर एखादी एजन्सी नियुक्त करून त्याची पडताळणी करावी लागेल मगच त्याबाबत निर्णय घेता येईल, असे आयुक्त म्हणाले.