अपघातांची मालिका : महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
पेठ : गत अनेक वर्षांपासून खड्ड्यांमधून धक्के खात प्रवास करणाऱ्या पेठवासीयांची नाशिक ते पेठ रस्त्याची समस्या सुटली असली तरीही रस्ता पूर्ण झाल्यापासून सुरू झालेली अपघातांची मालिका मात्र धडकी भरणारी ठरत आहे. त्यामुळे गड्या आपुले खड्डेच बरे होते असे म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे.
नाशिकपासून गुजरात राज्यातील पार्डीपर्यंतचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत जवळपास १३० कि.मी. काँक्रिटीकरण करण्यात आला. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला रस्ता चकाचक झाला असल्याने साहजिकच या रस्त्यावरून रहदारीही वाढली. गुजरात राज्यातील वापी, दमण, सेल्वास, राजस्थानपासून सर्व प्रकारचे अवजड वाहने याच मार्गावरून नाशिक, कर्नाटक, मध्यप्रदेशपर्यंत ये-जा करतात. शिवाय खाजगी वाहनांसह दुचाकींची संख्याही मोठ्या प्रमाणावर असल्याने पेठ तालुक्यातील सावळघाट व कोटंबीघाटात, तसेच बोरवठ फाटा ते देवगाव फाटादरम्यानच्या वळणावर अनेक दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये दुचाकीस्वारावर काळाचा घाला येत असून तरुण दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक अवजड वाहने वेगावरील नियंत्रण सुटल्याने पलटी होताना आढळून येत आहेत. एकीकडे रस्ता चांगला झाल्याचा आनंद असताना दुसरीकडे तरुण मुले अपघाताचे बळी पडत असल्याच्या दुःखद घटना घडत आहेत.
समाजमाध्यमातून जनजागृती
पेठसह सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यात तरुणांचा दुचाकीवरून प्रवास करण्याकडे अधिक कल दिसून येत असून, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, मद्यसेवन व बेपर्वाईने वाहन चालविताना अनेक अपघात घडून येत असल्याने सध्या समाजमाध्यमातून तरुणांना नाशिक महामार्गावरून वाहन चालविताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. पालकांनीही मुलांकडे वाहन देताना योग्य खबरदारी घेण्याबाबतचे संदेश समाजमाध्यमातून व्हायरल केले जात आहेत.
फोटो - १८ पेठ रोड
नाशिक-पेठ रस्त्यावर असे अपघाताचे दृश्य नित्याचेच बनले आहे. (संग्रहित छायाचित्र)
===Photopath===
180621\323318nsk_26_18062021_13.jpg
===Caption===
फोटो - १८ पेठ रोड नाशिक-पेठ रस्त्यावर असे अपघाताचे दृश्य नित्याचेच बनले आहे. ( संग्रहीत छायाचित्र )