येवला : पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे प्रवीण गायकवाड यांची निवड झाली आहे. अनुसूचित जमाती महिला वर्गासाठी आरक्षण निघाल्याने सभापतिपदाची निवड होऊ शकली नव्हती. असा उमेदवार नसल्याने हे आरक्षण अनुसूचित जमातीच्या पुरुषासाठी झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आदेशानुसार शुक्रवारी (दि.१०) निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रोहिदास वारुळे व गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांच्या उपस्थितीत विशेष सभा बोलाविण्यात आली होती.यापूर्वी सकाळी ११ वाजता सभापतिपदासाठी शिवसेनेचे सदस्य प्रवीण गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकमेव अर्ज असल्याने सभापतिपदावर तहसीलदारांनी प्रवीण गायकवाड यांची अविरोध निवड जाहीर केली. यानंतर ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली याच सभागृहात सत्कार सोहळा पार पडला. यावेळी पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. अरु ण काळे यांनी सूत्रसंचालन केले. तर चंद्रकांत शिंदे यांनी आभार मानले.
आदिवासी, सर्वसामान्य जनतेसाठी काम केल्याने जिल्हा परिषद निवडणुकीतही जनतेने निवडून दिले आणि आता पंचायत समितीत निवडून आल्यानंतर आज सभापती झालो. हे जनतेसाठी केलेल्या कामांचे फळ आहे. आगामी काळातही जनतेची अहोरात्र सेवा करणार आहे.- प्रवीण गायकवाड, सभापती, येवला पंचायत समिती