पेठ : शासनाच्या वन विभागाच्या वतीने जंगलातील झाडांच्या अवैध तस्करीवर नियंत्रण आणणेसाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत असल्याने त्यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश येत असतांनाच वन्यपक्ष्यांच्या तस्करीचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. झरी वनक्षेत्रात पक्ष्यांना टार्गेट करत त्यांची तस्करी करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे.झरी वनक्षेत्रात क्न विभागाचे अधिकारी रात्रीचे वेळी गस्त घालत असतांना महेंद्र कंपनीची (क्रमांक सीजे १५ झेड ५४१९) गाडी संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. गाडीची तपासणी केली असता त्यात गावठी बंदूक, छर्रे, जस्ताचे तुकडे यांच्यासह ८ जिवंत व १६ मृत वटवाघुळे आढळून आली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गाडीतील वाहन चालक हिराभाई कोंती (रा. खडकवाळ ,ता. कापराडा ,जि. बलसाड ) व त्याचे समवेत शैलेश वडाळी, गणेश कोती, रसिक भोया राजू कोंती अक्षय कोंती (सर्व रा. खडकवाळा,ता. कापराडा, जि. बलसाड) तसेच महेंदभाई कोंती (रा.सिव्हा, ता. कापराडा) यांना ताब्यात घेण्यात आले. वन्यप्राणी संरक्षण अधिनियमाचा भंग करण्यात आल्याने त्यांना नाशिकच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सहाय्यक व्यवस्थापक व्हि.सी. ढगे , एस.एच.वाजे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल पी.आर.जाधव,प्रभारी वनपाल एम.पी.जोशी, आर.डी. चव्हाण, वनरक्षक नितीन पवार, व्ही.एम. वानखेडे,मंगेश वाघ आदींनी ही कारवाई केली.
वन्यपक्ष्यांची तस्करी करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 6:05 PM
गुजरात कनेक्शन : रानातील दुर्मीळ पक्षी टार्गेट
ठळक मुद्देगाडीची तपासणी केली असता त्यात गावठी बंदूक, छर्रे, जस्ताचे तुकडे यांच्यासह ८ जिवंत व १६ मृत वटवाघुळे आढळून आली