ईश्वर त्रिभुवन गुप्ता या व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांनी गुप्ता यांच्यासोबत ओळख करून मुंबईतील एका व्यापाऱ्याकडे कस्टमचे सोने आलेले आहे. ते प्रतितोळा तीस हजार रुपयांनी देण्यास तयार असल्याचे आमिष दाखवले. त्यामुळे गुप्ता यांनी ७५ लाख रुपयांचे अडीच किलो सोने खरेदीची तयारी दर्शविली. संशयितांनी गुप्ता यांच्याकडून ७५ लाख रुपयांची रोकड घेत पोबारा केला होता. गुप्ता यांनी म्हसरूळ पोलिसांकडे धाव घेत फसवणुकीची तक्रार दिली. दरम्यान, या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट एक करत असताना संशयितांच्या टोळीतील एक मदन साळुंके हा मखमलाबाद रोडवर येणार असल्याचे खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या पथकाने सापळा रचला. संशयास्पद हालचालींवरून मदन यास पकडले. मदन मोतीराम साळुंके (४०, रा. मातोरी), शरद विठ्ठल ढोबळे (४२, रा. मखमलाबाद रोड) व मनेश श्रीराम पाटील (४०, रा. कामटवाडे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मुख्य सूत्रधार संताेष विठ्ठल ढोबळे हा फरार असल्याची माहिती उपायुक्त संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
---इन्फो--
रविवारपर्यंत पोलीस कोठडी
व्यापाऱ्याची लूट करत पोबारा करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अद्याप या गुन्ह्यात फरार आहे. तसेच या टोळीने अशाप्रकारे अन्य काही गुन्हे यापूर्वी केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यादृष्टीने चौकशी व तपास करावयाचा असल्याने या तिघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने येत्या रविवारपर्यंत (दि.२७) पोलीस कोठडी सुनावली आहे.