येवला : विवाहेच्छुकांची फसवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील दोघांना शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. शहर व परिसरातील विवाहासाठी इच्छुक तरुणाला मुलगी दाखवून विवाह लावून देण्याच्या बहाण्याने येवल्यातील केदार कुटुंबाची ३ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी लता केदार यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसात विवाह लावणारे साहेबराव विठ्ठल गीते रा.ब्राह्मणवाडे ता.सिन्नर, संतोष मुरलीधर फड रा.भुसे भेंडाळी ता.निफाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहायक निरीक्षक नितीन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मेढे यांनी सहकारी पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोरे, पोलीस हवालदार दीपक शिरुड, पोलीस नाईक राकेश होलगडे, पोलीस शिपाई गणेश घुगे, महिला पोलीस शिपाई माई थोरात यांच्या साथीने कसून तपास करत, दोघा मुख्य संशयित यांना ताब्यात घेतले.
इन्फो
टोळीच असण्याची शक्यता
विवाहेच्छुकांची फसवणूक करणारी टोळी असल्याचे तपासात लक्षात आल्याने, इतर संशयिताचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून, लवकरच संपूर्ण टोळी गजाआड केली जाईल, असे पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे यांनी सांगितले. अशा पद्धतीने कोणाची फसवणूक झाली असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही मेढे यांनी केले आहे.