नाशिक : विविध मुद्द्यांवरून दरवर्षी वादळी ठरणारी क्रांतिवीर वंसतराव नारायणराव शिक्षण प्रसारक संस्थेची या वर्षीची सर्वसाधारण सभा संस्थेत कार्यरत कर्मचारी सभासदांच्या सभासदत्वाच्या मुद्द्यावरून गाजली. काही सभासदांनी संस्थेच्या घटनेचा दाखला देत, संस्थेतील कर्मचाऱ्यांचे आजीव सभासदत्व रद्द करण्याची मागणी केली. मात्र, कर्मचारी सभासदत्वाच्या मुद्द्यावर सभासदांनी घेतलेली आक्रमक भूमिका लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी घटनेतील नियमावलीप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन देत सभेचे कामकाज पूर्ण केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा या वर्षी पहिल्यांदाच ऑनलाइन घेण्यात आली. थोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली सभा प्रथम कोरमअभावी तहकूब करावी लागली. मात्र, अर्धा तासानंतर तहकूब सभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. यावेळी सभेला उपाध्यक्ष अॅड. पी.आर. गिते, सहचिटणीस अॅड.तानाजी जायभावे, विश्वस्त दिगंबर गीते, सुभाष कराड, दामोदर मानकर, संचालक विलास आव्हाड, विष्णू नागरे, सुरेश घुगे, मंगेश नागरे आदी संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. संचालक मंडळाने सभासदांसमोर आढावा मांडताना संस्थेच्या डीफार्मसी महाविद्यालयास मान्यता मिळाल्याचे सांगितले, तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे अभियांत्रिकी महाविद्यालयात विलीनीकरण, मुख्यालयातील इमारतींचे पूर्णत्वाचे दाखले प्राप्त झाल्याचेही स्पष्ट केले.
संस्थेकडून मयत सभासदांची यादी अद्यावत कराताना वारसांना सभासदत्व कधी मिळणार, याविषयी एकनाथ कांगणे, महेश आव्हाड, अनिल शेळके यांनी प्रश्न उपस्थित केले. त्याचप्रमाणे, निवडणुकीपूर्वी सभासदांची यादी अद्यावत केली जात असताना, मध्यावधीत याविषयी कार्यवाही करण्यावर काही सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर लवकरच कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय यादी प्रसिद्ध करण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले. दरम्यान, सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या कामकाजाचा आढावा सभासदांसमोर मांडला. सभेतील चर्चेत प्रशांत भाबड, संतोष कथार, अनिल सानप, गोकुळ काकड, रामप्रसाद कातकाडे, सुदाम बोडके, शरद बोडके, प्रकाश घुगे, अजित आव्हाड, बापू सानप, राम उगले, बाळासाहेब गामणे, मधुकर दराडे, चेतन चांदवडे आदींनी सहभाग घेतला.