नाशिक : पंचवटी भागातील मोरे मळ्यात २० मे २०१६ च्या रात्री घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी गजानन मदन झरे याला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मोरे मळ्यात घडलेल्या या प्रकरणात तब्बल पाच वर्षांनी निकाल आला आहे.
मोरे मळ्यातील सार्वजनिक शौचालयात पीडित मुलगी २० व २१ मे २०१६ च्या रात्री शौचासाठी गेलेली असताना आरोपी गजानन मदन झरे (२२, रा, मोरे मळा) याने पाठीमागून जात तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणात पंचवटी पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एच. एन. देवरे यांनी आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एस. नायर यांनी गजानन झरे याच्या विरोधातील साक्षी व परिस्थितीजन्य पुराव्यांना अनुसरून त्याला १० वर्षे सश्रम कारावस व दहा हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून दीपक्षिखा भिडे व योगेश कापसे यांनी कामकाज पाहिले. तर पोलीस हवालदार एम. एम. पिंगळे व पोलीस नाईक एस. एल. जगताप यांनी खटल्याचा पाठपुरावा केल्याची माहिती पोलिसांनी दिली.