इंदिरानगर : गण गण गणात बोते, गजानन महाराज की जयच्या जयघोषात श्रींची पालखी मिरवणूक काढून परिसरातील गजानन मंदिरात गजानन महाराज प्रगटदिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.इंदिरानगर येथील श्री गजानन महाराज प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी नऊ वाजता श्रींच्या मुकूट व पादुकांची पालखी मिरवणूक कमोदनगर, सिद्धिविनायक कॉलनी ते बापू बंगला, वडाळा पाथर्डी रस्ता, सावरकर चौक, चार्वक चौक, मोदकेश्वर चौक आदी मार्गे काढण्यात आली. पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी अश्वमेध होता तसेच टाळ-मृदुंगाच्या ताला गण गणात बोते, गजानन महाराज की जय, च्या जयघोषात भाविक तल्लीन झालेले दिसून आले सकाळी ६ वाजता श्रींची महापूजा करण्यात आली दुपारी १२ वाजता महाआरती त्यानंतर एक वाजेपासून महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले. चेतनानगर येथील इच्छापूर्ती बहुद्देशीय मित्रमंडळाच्या वतीने श्री गजानन महाराज प्रकट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामूहिक साखळी पारायण, सकाळी महापूजा, दुपारी आरती त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पाथर्डी फाटा येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सकाळी ८ वाजता श्रींची पालखी मिरवणूक परिसरातूनकाढण्यात आली होती. यावेळी गण गणात बोते गजानन महाराज की जय या जयघोषाने परिसरभक्तिमय झाला होता. दुपारी साडेबारा वाजता मारती त्यानंतर महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले होते. वन वैभव कॉलनी येथील श्री गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.जत्रेचे स्वरुपश्री गजानन महाराज मंदिराच्या लगतच श्रीफळ फुलेसह विविध दुकाने थाटल्याने जणूकाही जत्रेचे स्वरूप परिसराला प्राप्त झाले होते. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत भाविकांनी लांबच लांब दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. श्रीचा पालखी मिरवणुकीच्या मार्गावर ठीक ठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात येऊन ठिकठिकाणी सुवासिनींनी श्रींच्या पालखीचे औक्षण करून दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.
इंदिरानगरला गजानन महाराजांची पालखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:29 PM