लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : शहर परिसरात लाडक्या गणरायाचे साध्या पद्धतीने व शांततेत आगमन झाले. कोरोनाच्या सावटामुळे घोटी शहरातील मंडळानी स्वयंस्फूर्तीने सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घेतला असून, घरोघरी श्रींचे आगमन झाले. घरोघरी गणेशमूर्तींची भक्तिभावाने व विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली.सकाळपासूनच गणेशमूर्ती स्थापनेचा मुहूर्त असल्याने गणेशभक्तांची धावपळ होती. घोटीच्या बाजारपेठेत श्रीफळ, हार, फुले, गणेश पूजनाचे साहित्य व आरास साहित्य खरेदीसाठी गर्दी होती, तर घरगुती गणेशमूर्ती स्थापनेची लगबग सुरू होती. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे ना ढोलताशांचा गजर होता, ना गुलालाची उधळण होती. घोटी शहराबरोबर ग्रामीण भागातून मूर्ती नेण्यासाठी गर्दी झाली होती. वासुदेव चौक, जैन मंदिर, चौदा नंबर नाका व मारु ती मंदिर परिसर हा गजबजून गेला होता.शहर व परिसरात गणेश उत्सव शांततेत साजरा करावा, उत्सव साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची गणेशभक्तांनी व भाविकांनी दखल घ्यावी तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, फिजिकल डिस्टन्स ठेवावे, असे आवाहन घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जालिंदर पळे यांनी केले.यावर्षी मागील वर्षापेक्षा मूर्ती दरात वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली आहे. भविकांनी मनोभावे पूजा करून गणेशाचा जयघोष करीत मूर्ती घरी नेल्या.
जैन बांधवांची घरातच उपासनाशहरात भक्तिमय वातावरण झाले असतानाच जैन धर्मीयांचे पर्युषण पर्व सुरू असल्यामुळे घोटी शहरात धार्मिक कार्याचा पूर वाहत होता. त्यातच रविवारी क्षमापना दिवस असल्याने सर्व जैन बांधवांचे जप-तप सुरू आहे. चतुर्मास सुरु असताना तसेच साधू-संत जैन स्थानकात उपस्थित असताना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जैन बांधवांनी घरातूनच धर्मसाधना केली.