नाशिक : जमिनीतून सोने काढून देण्याचे आमिष दाखवत हातचलाखीने इंदिरानगरच्या एका भोंदूबाबाने आश्रमाच्या कामासाठी सातपूरच्या एका व्यक्तीला १ लाख १२ हजार ६०० रुपयांना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी संश्यित भोंदूबाबाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, इंदिरानगरच्या मच्ंिछद्रनाथ ट्रस्ट संचलित बडे बाबा आश्रमातून संशयित आरोपी श्री १००८ महंत गणेश आनंदगिरी महाराज उर्फ गणेश जयराम जगताप हा फरार झाला आहे.भोंदू गणेश जगताप हा स्वत:ला १००८ महंत सांगून मच्छिंद्रनाथ ट्रस्ट स्थापन करून ‘बडे बाबा’ नावाने आश्रम इंदिरानगर भागात चालवित होता. जगताप याने सातपूर पोलीस चौकीसमोर अशोकनगर येथे राहणारे पुखराज दीपाजी चौधरी(४८) यांना जमिनीतून सोने काढून देतो, असे आमिष दाखविले. यानंतर जानेवारी २०१९ ते आतापर्यंत वेळोवेळी पैसे उकळले. चौधरी यांना या भोंदू गणेश महाराजाने तब्बल १ लाख १२ हजार ६०० रुपयांना गंडविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश जगतापविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या भोंदू बाबाने आश्रम उभारणीसाठी अशाप्रकारे अजून किती भाविकांना चुना लावला असेल? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. चौधरी यांनी पोलिसांकडे धाव घेतल्याची कुणकुण लागताच बडेबाबा आश्रम सोडून गणेशने पलायन केल्याचे तपासी अधिकारी उपनिरीक्षक एस. के. काळे यांनी सांगितले. पोलिसांचे पथक त्याच्या मागावर असून, त्याला ताब्यात घेतले जाईल. भोंदूबाबाकडून ज्यांची आर्थिक फसवणूक झाली असेल, त्यांनी तत्काळ सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन काळे यांनी केले आहे. गुप्तधन दैवी चमत्काराने काढून देण्याचे आमिष दाखविल्याने या भोंदूबाबाविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाशिक शाखेच्या वतीने राज्यसचिव डॉ. ठकसेन गोरोणे, महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे आदींनी निवेदनाद्वारे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
जमिनीतून सोने काढून देतो सांगून १ लाखाला गंडा; बडेबाबा आश्रममधून भोंदू महराज फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 9:14 PM
भोंदू गणेश जगताप हा स्वत:ला १००८ महंत सांगून मच्छिंद्रनाथ ट्रस्ट स्थापन करून ‘बडे बाबा’ नावाने आश्रम इंदिरानगर भागात चालवित होता.
ठळक मुद्देजमिनीतून सोने काढून देतो, असे आमिष जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी