नाशिक : शहरात भाजी बाजारात तेजी असून आल्याला मागणी जास्त आहे व आवक कमी असल्याने तुम्हाला चांगला हमीभाव मिळवून देतो, असे सांगून शहरातील एका लबाडाने कर्नाटकच्या व्यापाऱ्याकडून १२ टन आले (अद्रक) खरेदी करत त्यास केवळ ट्रकभाडे अदा करुन सुमारे पावणे चार लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक शनिवारी (दि.१२) प्रकार उघडकीस आला आहे.
एका ऑनलाइन ॲप्लिकेशनद्वारे पाच महिन्यांपूर्वी नाशिक शहरातील संशयित मोसीन शेख (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) नावाच्या व्यापाऱ्याने फिर्यादी तौफिक फय्याज अहमद अन्सर (४०, दारुल अमन मंजील, चिखमंगळुर, कर्नाटक) या शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याशी संपर्क साधला. नाशिक शहरासह जिल्ह्यात आल्याला चांगला हमीभाव आहे. बाजार तेजीत असून मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त चांगला माल घेऊन या, तुम्हाला ३७०० रुपये क्विंटल दराने किंमत मिळेल’ असे सांगितले.
प्रत्यक्षात ३५०० रुपये क्विंटल या दराने संशयित मोसीन याने तौफिक यांच्यासोबत १२ टन आले खरेदीचा बनाव केला. आडगाव जकात नाक्यावर पोहचल्यानंतर त्यांनी आले भरलेल्या २०४ गोण्यांचा आयशर ट्रक जकात नाक्यावर उभा केला. मोसीन याने सांगितलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मोसीन यास संपर्क केला असता त्याने भेट घेण्यास नकार दर्शविला. संशयिताने केवळ ट्रकभाडे ४० हजार रुपये व खर्चापोटी १० हजार असे एकूण ५० हजार रुपये ऑनलाइन बँक खात्यात पाठविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उर्वरित ३ लाख ७० हजार रुपयांचा अपहार केल्याचे तौफिक यांनी म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---इन्फो---
जकात नाक्यावरून लांबविल्या १५२ गोण्या
संशयिताने पहाटेच्या सुमारास आयशर टेम्पो व एक पिकअप जीप घेऊन आडगाव जकात नाक्यावर उभा असलेला ट्रक गाठला. तेथे आल्याच्या गोण्या ज्या कर्नाटकच्या ट्रकमध्ये होत्या त्या ट्रकचालकाला दमबाजी केली. ट्रकमधून १०० गोण्या आयशर ट्रकमध्ये (एम.एच१५. एफव्ही २२७८) तसेच दोन पिकअप जीपमध्ये प्रत्येकी ५२ गोण्या पिकअप जीपमध्ये (एम.एच१५ जीव्ही ९७२१) भरून पोबारा केला. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी परस्पर आल्याचा माल विक्री करत फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.