लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंचवटीतील रामकुंडापासून अवघ्या काही अंतरावरील मालेगाव स्टॅण्डवर सुरू असलेली मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यासाठी परिसरातील संतप्त महिलांनी रविवारी (दि़७) सकाळी गांधीगिरीमार्गाने आंदोलन केले़ महिलांनी या ठिकाणच्या तिन्ही मद्यविक्रेत्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुन्हा मद्यविक्री न करण्याचे विनंतीपत्र देत दुकाने बंद केली़ दरम्यान, यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंचवटी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़पंचवटीतील मालेगाव स्टॅण्डवर देशी दारू दुकान, वाइन शॉप व बिअर बार व परमिट रूम आहे़ मद्यपींकडून रात्री- बेरात्री केली जाणारी शिवीगाळ, परिसरातील अस्वच्छता तसेच महिलांची छेडछाड यामुळे महिला तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो़ त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन मद्यविक्रीची दुकाने बंद करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस आयुक्तांना २३ एप्रिल रोजी निवेदन दिले होते. सात दिवसांत ही दुकाने बंद अथवा स्थलांतरित न केल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला होता़
मद्यविक्री दुकान बंद करण्यासाठी गांधीगिरी
By admin | Published: May 08, 2017 1:28 AM