खर्डे : खुंटेवाडी परिसरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असताना सार्वजनिक बांधकाम खाते बघ्याची भूमिका घेत असल्याने खुंटेवाडी ग्रामस्थांनी गांधीगिरी करीत खुंटेवाडी फाट्यावर झेब्रा पट्टे मारून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदविला. आठ दिवसात खुंटेवाडी फाट्यावर गतिरोधक बसविले नाही तर देवळा पाचकंदील येथे आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. देवळा -मालेगाव रस्त्यावर तीन किलोमीटर अंतरावर खुंटेवाडी फाटा आहे. रस्त्याला दोन ते तीन ठिकाणी मोठे वळण असल्याने वाहनचालक जोरात वाहन चालवीत असल्याने रोज लहान-मोठे अपघात होत आहेत. सदरच्या वळणांवर व खुंटेवाडी फाटा येथे दुभाजक पट्टे व गतिरोधक बसविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागकडे अनेकवेळा लेखी , तोंडी तक्र ार करून कोणताही उपयोग झालेला नाही.दोन दिवसांपूर्वी सदरच्या ठिकाणी दोन वाहनांचा अपघत होऊन एकाचा नाहक बळी गेला. त्यामुळे नाईलाजाने आम्ही लोकशाही मार्गाने गांधीगिरी करीत रस्त्यावर झेब्रा पट्टे मारले असून आठ दिवसात सदरच्या वळणांवर गतीरोधक बसविले नाहीत तर नाईलाजाने आम्हाला आंदोलन छेडावे लागेल असे निवेदनात शेवटी म्हटले आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पगार यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
खुंटेवाडी ग्रामस्थांची गांधीगिरी ; झेब्रा पट्टे मारून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 1:47 AM