धार्मिक कार्यक्रम : सहाव्या माळेपासून होणार प्रारंभउपनगर : गांधीनगर येथे नवरात्रीच्या सहाव्या माळेपासून प्रारंभ होणाऱ्या बंगाली बांधवांच्या दुर्गापूजा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. नाशिक सर्बोजनीन दुर्गापूजा उत्सव समितीतर्फे गांधीनगर येथे नवरात्रीच्या सहाव्या माळेपासून दुर्गापूजा उत्सव धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो. त्यानिमित्ताने २०० फुटांचे दोन भव्य शामियाने उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच वेल्फेअर मैदानावर कोलकाता येथून आलेल्या कारागीरांकडून दुर्गा मातेची भव्य मूर्ती साकारली जात आहे. बंगाली बांधवांच्या दुर्गापूजा उत्सवात दुर्गा मातेबरोबरच गणपती, सरस्वती व कार्तिकेय या देवी-देवतांच्या मूर्तींचीही प्रतिष्ठापना करण्यात येते. येत्या ७ ते ११ आॅक्टोबरपर्यंत हा उत्सव चालणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष सुजॉय गुप्ता यांनी दिली. दुर्गा पूजेनिमित्त पुष्पांजली आमंत्रण, बोधन, बलिदान, संधीपूजा, अपरिजिता पूजा, सिंदूर उत्सव आदि धार्मिक विधीस बंगाली बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दुर्गापूजा उत्सव समितीचे दीपक घोष, बिरूदास गुप्ता, पी. के. बिश्वास आदिंनी केले आहे. (वार्ताहर)
गांधीनगरला दुर्गापूजा उत्सवा सुरू
By admin | Published: October 02, 2016 11:33 PM