सिडको : महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागाच्या वतीने श्री गणरायास निरोप देण्यासाठी आयटीआय पूल येथे गणेश घाट उभारण्यात आला आहे. याबरोबरच गणेशमूर्ती संकलनासाठी एकूण सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.श्री गणरायास भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह घराघरातील नागरिक सज्ज झाले आहेत. दरवर्षी सिडको मनपाच्या बांधकाम विभागाच्या वतीने आयटीआय पूल येथे गणेश विसर्जन घाटाची, तसेच बाप्पाची मूर्ती दान करण्यासाठी व निर्माल्य संकलनासाठी व्यवस्था केली जाते. यंदाच्या वर्षी आयटीआय पूल येथील गणेश विसर्जन घाट सज्ज झाला आहे. बांधकाम विभागाचे प्रमुख प्रकाश पठाडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच दिवसांपासून गणेश विसर्जन घाट तयार करण्याची तयारी सुरू होती. याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच बाप्पाचे विसर्जन न करता त्याचे दान करावे, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आठ फूट लांब व चार फूट रुंदीचे दोन लोखंडी कृत्रिम तलाव ठेवण्यात आले आहेत. याबरोबरच निर्माल्य संकलनासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. मंडळांनी तसेच घराघरातील दान केलेल्या बाप्पांचे संकलनासाठी चार ट्रॅक्टर, चार डंपर तसेच पंधरा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शहर अभियंता सुनील खुने, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, उपअभियंता प्रकाश पठाडे आदिंच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे. (वार्ताहर)