स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी सोमवारी (दि.८) भाजपच्या वतीने गणेश गिते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही गणित जुळत नसल्याने घोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेनेने तटस्थतेची घोषणा केली आणि भाजपाला एक प्रकारे पुढे चाल दिली होती. साहजिकच एकमेव अर्ज दाखल असल्याने गिते यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता बाकी होती. ती मंगळवारी (दि.९) पार पडली. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत गिते यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर त्यांची निवड झाल्याची घाेषणा मांढरे यांनी केली. १६ सदस्य संख्या असलेल्या या समितीत भाजपचे आठ आणि त्यांना साथ देणारे मनसेचे सलीम शेख हे उपस्थित होते. विराेधकांपैकी शिवसेनेचे पाचही सदस्य गैरहजर होते, तर काँग्रेसचे राहुल दिवे आणि राष्ट्रवादीच्या समिना मेनन या मात्र उपस्थित होत्या. गिते यांच्या निवडीने भाजपने जल्लोष केला. महापौर सतीश कुलकर्णी, लक्ष्मण सावजी, सतीश सोनवणे, जगदीश पाटील तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी गिते यांचा सत्कार केलाच, परंतु रामायण बाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
काेट...
आता मेट्रो, बिटकोला प्राधान्य
भाजपने निष्ठावान म्हणून दुसऱ्यांदा संधी दिली आणि सर्व नेत्यांबरोबरच मनसे तसेच अन्य शिवसेनेसह सर्वच पक्षांचे सभापती होण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे. शहरात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी प्राधान्य देताना नवीन सुसज्ज बिटको रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करणे आणि तेथे पीजी शिक्षणक्रम सुरू करण्यास प्राधान्य राहणार आहे.
- गणेश गिते, नवनिर्वाचित सभापती, स्थायी समिती
कोट...
स्थायी समिती भाजपने राखली आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना अखेरीस माघार घ्यावी लागली आहे. भाजपने यानिमित्ताने सत्ता राखली असेच नाही, तर आगमी पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा सत्ता येणारच याची ही नांदी आहे.
- सतीश कुलकर्णी, महापौर
इन्फो...
नाशिक महापालिकेच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा सभापतिपद मिळवणारे गिते ही तिसरे नगरसेवक आहेत. यापूर्वी १९९२-९३ व १९९३-९४ यावर्षी प्रथम सभापती काँग्रेसचे उत्तमराव कांबळेे तसेच १९६-९७ या दोन वर्षांत विजय बळवंत पाटील सलग तिसऱ्यांदा सभापतिपद मिळवले होते.