नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कंपन्या आणि खासगी मित्रमंडळाचा गणेशोत्सव बी. डी. भालेकर मैदानावर साजरा केला जात असताना यंदाच्या वर्षापासून आयुक्तांनी त्यास मनाई केली आहे. याठिकाणी ई पार्किंगचे काम सुरू असून, पार्किंगच्या जागेत देखावे कसा उभारता येईल, असा प्रश्न आयुक्तांनी केल्याचे संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. काही मंडळांना तर तपोवनातील मोकळ्या जागेत उत्सव साजरा करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे वृत्त असून, त्यामुळे संतप्त झालेल्या मंडळांनी लोकप्रतिनिधींना साकडे घालण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या बी. डी. भालेकर मैदानावर महिंद्रा अँड महिंद्रा गणेशोत्सव मंडळ, एच.ए.एल. मंडळ, महिंद्रा सोना गणेशोत्सव, बॉश मंडळ, श्री राजे छत्रपती सामजिक मंडळ, श्री गणेश मूकबधिर मंडळ, श्री नरहरी राजा सामाजिक मंडळ आदी मंडळे गणेशोत्सवात देखावे साजरे करतात. सीबीएससारख्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या देखाव्यांना पाहण्यासाठी जिल्हाभरातून नागरिक येत असतात. महापालिकेच्या वतीने याठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत पार्किंगचे काम सुरू असून, त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी श्री गणेश मूकबधिर मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात आयुक्तांची भेट घेतली तेव्हा त्यांनी पार्किंगच्या जागेत देखावे उभारण्याऐवजी तपोवनात देखावे उभारण्याचा सल्ला दिल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. त्यावर मंगळवारी (दि.२४) गणेश बर्वे, सुनील भांडारे, हेमंत तेलंगी, गावंडे, देवेन हल्ली, सुशांत गालफाडे, विजय बिरारी यांनी आयुक्तांची भेट घेतली असता त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्रुच्चार केला. पार्किंगच्या जागेत देखावे उभारता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे असून, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यकर्त्यांनी उपमहापौर प्रथमेश गिते यांची भेट घेतली. गीते यांनी या मंडळांसाठी त्यांच्याबरोबर राहण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच कार्यकर्ते महापौरांनादेखील भेटणार आहेत.
गणेशमूर्ती देखाव्यांना यंदा भालेकर मैदानावर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:00 AM