नाशिक: अनंत चतुर्दशीनिमित्त शहरातून आज (गुरुवार) लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता मिरवणुकीला पारंपरिक पध्दतीने सुरुवात होणार आहे. यानिमित्त शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सकाळी १० वाजेपासून वाहतूक मार्गातील बदलाची अधिसूचना लागू होणार आहे.
विसर्जन मिरवणूक जुने नाशिक, वाकडी बारव, दादासाहेब फाळकेरोड, महात्मा फुले मंडई, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली भाजीबाजार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, एम.जी.रोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट गल्ली, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, कपालेश्वर मंदिर, भाजीबाजार, म्हसोबा पटांगणावरून गोदाकाठालगत विसर्जन ठिकाणी पोहचणार आहे.असा आहे वाहतूक मार्गात बदल:
विसर्जन मिरवणुकीदरम्यान, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या सर्व शहर बसेस या पंचवटी आगारातून सुटतील. तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बसेस व अन्य सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलवरून नाशिकरोड, नाशिक शहर व शहरातील अन्य ठिकाणी जातील. पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका येथून कन्नमवार पुलामार्गे पुढे जातील. रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस शालिमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिली आहे.आनंदवली- चांदशी गाव रस्ता वाहतुकीसाठी बंद:
आनंदवली, गंगापूररोड परिसरातील बहुतांश गणेश मित्रमंडळांकडून आनंदवली येथील गोदाकाठावर विसर्जनासाठी गर्दी केली जाते. यामुळे चांदशी गावाकडून आनंदवली नदीपात्र ओलांडून आनंदवलीगाव मार्गे गंगापूरला जोडणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चांदशीगाव ते आनंदवली अमरधाम हा रस्ता दोन्ही बाजूने (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी चार वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहील. नाशिककडे येणारी व नाशिकहून चांदशीकडे जाणाºया वाहनचालकांनी आनंदवली पुलाकडे न जाता चांदशीगाव रोडने नाशिक डावा तट कालवा येथून उजव्या बाजूने वळून कालवामार्गे मखमलाबाद रोडने रामवाडीमार्गे अशोकस्तंभ ते गंगापूररोड या मार्गाने प्रवास करावा, असा पर्यायी मार्ग शहर वाहतूक शाखेने सुचविला आहे.