पंचवटी : पंचवटीत यंदाही गणेश मंडळांनी पौराणिक तसेच धार्मिक देखावे भाविकांसमोर साकारले आहेत. यंदाच्या वर्षी जवळपास ८० हून अधिक छोट्या- मोठ्या मित्रमंडळांनी प्रशासनाकडे परवानगी घेतली आहे. सुमारे चाळीस ते पन्नास वर्षांहून अधिक वर्षे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी यंदा आरास मांडल्या असून देखावे बघण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. पंचवटी कारंजा येथील गुरुदत्त शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा मंडळाचे यंदा ३७ वे वर्ष असून मंडळाने यंदा कुंभकर्णाचा वध देखावा साकारला आहे. राम कुंभकर्णाचा वध करत असताना ब्रह्मा, विष्णू प्रगट झालेले आहे त्यापाठोपाठ विविध देवदेवतांच्या मूर्ती देखाव्यात साकारल्या आहेत. शिवाजी चौकातील भगवती शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा मंडळाने ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले हा चलचित्रपर आधारित देखावा साकारला आहे.सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी मित्रमंडळाने यंदा गणेशाची प्रतिष्ठापना करून सलग दहा दिवस भाविकांसाठी विविध मनोरंजनात्मक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात रांगोळी, संगीत खुर्ची, लहान मुलांसाठी डान्स, कॉमेडी शो, देशभक्तीपर गीते तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. मालेगाव स्टॅन्ड मित्रमंडळाने ‘संत गोरा कुंभाराची भक्ती’ असा चलचित्रपर देखावा साकारला आहे. संत गोरा कुंभार भक्तीत तल्लीन होऊन चिखल तुडवित असताना त्यांच्या मुलालाही पायाखाली तुडवितात. मुलाचा चेंदामेंदा झाल्याचे पाहताच त्यांची पत्नी हंबरडा फोडते त्यावेळी साक्षात विठ्ठल प्रगट होतात असा देखावा साकारला आहे मंडळाचे ७५ वे वर्ष आहे. सरदार चौक मित्रमंडळाने यावर्षी भक्त प्रल्हादाची भक्ती नरसिंह अवतार असा चलचित्रपर देखावा साकारला आहे.
गणेश मंडळांचा पंचवटीत पौराणिक देखाव्यांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:27 AM