नाशिक : उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणीत दिलेल्या निर्देशानुसार यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर अनेक बंधने टाकण्यात आली असून, मंडळांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले किंवा नाही हे पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरात तीन पथके गठित केली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या पथकांकडून प्रत्येक गणेश मंडळाला भेट देऊन कायद्याच्या पालनाबाबत ‘समज’ दिली जात आहे. जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी गेल्या आठवड्यात यासंदर्भात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तीन पथके गठित केली आहेत. या पथकांमध्ये नायब तहसीलदार, महापालिकेचे विभागीय अधिकारी, संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा समावेश असून, पथकांना त्यांच्या कामकाजाची कक्षाही ठरवून देण्यात आली आहे. सार्वजनिक उत्सव साजरे करताना मंडळांकडून रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारे मंडप उभारले जातात त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याबरोबरच अपघातांना निमंत्रण मिळते, तसेच नागरिकांचा रस्त्यावर चालण्याचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवून त्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यायालयाच्या या आदेशान्वये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी तीन दिवस अगोदरच संबंधित मंडळांना त्याची जाणीव करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले असेल अशा मंडळांना तत्काळ लेखी समज दिली जात असून, मंडळांनी उत्सवापूर्वी तीन दिवस अगोदर सर्व अनुमत्या घ्याव्यात, अन्यथा गणेशोत्सव साजरा करण्यास निर्बंध लावण्याचा इशाराही देण्यात आला आहे.पथकाशी हुज्जतदोन दिवसांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला कायद्याच्या पालनाबाबत समज देणाºया पथकाला ठिकठिकाणी रोषाला सामोरे जावे लागत आहे. मंडप उभारणीची अनुमती मिळत नसल्याच्या तक्रारीही यावेळी करण्यात आल्या, तसेच गेल्या वर्षी कोणतेही निर्बंध नसताना यंदाच अडवणूक का केली जात आहे, असा जाबही या पथकाला विचारण्यात येत आहे. काही ठिकाणी राजकीय दबावही टाकण्यात आला.पथकाकडून अशी होते चौकशीप्रामुख्याने गणेश मंडळांनी मंडप उभारण्यासाठी महापालिका, पोलीस व वाहतूक विभागाची अनुमती घेतली आहे काय, मंडप रस्त्याच्या कडेला व अडथळा न आणणारा उभारण्यात यावा, धर्मादाय आयुक्त कार्यालयात त्याची नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. या बाबींची गेल्या दोन दिवसांपासून पथकामार्फत तपासणी केली जात आहे. अटींची पूर्तता न करणाºयांवर कारवाई केली जात आहे.
गणेशोत्सव मंडळांना मंडप हटवावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:43 AM