नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखा युनिट-१चे पथक रात्रपाळीवर गस्तीवर असताना महालक्ष्मीनगर भागात दरोड्याच्या पूर्वतयारीत असलेल्या चौघा संशयितांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.अंबड गावातील महालक्ष्मीनगर भागात साध्या वेशातील गुन्हे शाखा युनिट-१चे पथक शुक्रवारी (दि.३१) रात्री गस्तीवर होते. यावेळी संशयित रियासत अली रियाजुद्दीन मन्सुरी (२७), सिकंदरखान छोटूखान पठाण (४०), अरबाज रफिक शेख (२१), अजहर सरफराज शेख (१९), सलमान शेख (सर्व रा. शिवालाकला, जि. बिजनौर, उ.प्र.) या पाच संशयितांचे टोळके काही संशयास्पद हालचाली करताना रात्री बारा वाजेच्या सुमारास पोलिसांना आढळून आले. यावेळी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने चौघांना ताब्यात घेतले, मात्र अंधाराचा फायदा घेत सलमान पोलीस पथकाच्या तावडीतून निसटून जाण्यात यशस्वी झाला. चौघांची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडून एका गावठी पिस्तूलसह दोन जिवंत काडतुसे, धारदार मोठा सुरा, लोखंडी पोपट पान्हा, स्कू्र-ड्रायव्हर, लोखंडी मोठी कटावणी, नायलॉन दोरी यांसारखी घरफोडीसाठी लागणारी व प्राणघातक हत्यारे मिळून आली. पोलिसांनी या चौघांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या टोळीतील फरार संशयित सलमानचा शोध घेतला जात आहे. तसेच चौघा संशयितांची कसून चौकशी केली जात असून त्यांच्याकडून शहरातील विविध भागात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बलराम पालकर हे करीत आहेत.
दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अंबडमध्ये जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 2:23 PM
पोलिसांना त्यांच्याकडून एका गावठी पिस्तूलसह दोन जिवंत काडतुसे, धारदार मोठा सुरा, लोखंडी पोपट पान्हा, स्कू्र-ड्रायव्हर, लोखंडी मोठी कटावणी, नायलॉन दोरी यांसारखी घरफोडीसाठी लागणारी व प्राणघातक हत्यारे मिळून आली
ठळक मुद्देटोळीतील फरार संशयित सलमानचा शोध घेतला जात आहे.