नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी बसस्थानक परिसरात पंचेचाळीस वर्षीय महिलेवर बुधवारी (दि.२७) रात्री चार जणांकडून सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर चार तासांत पोलिसांनी चौघांना जेरबंद केले आहे.
बुधवार (२७) रात्री अकरा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान पीडित महिला बसस्थानक परिसरात एका व्यक्तीशी बोलत असताना दुचाकीवर आलेल्या तरुणांनी तीला जबरदस्तीने घेऊन जात दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अन्य दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला. घटनेआधी महिलेसोबत बोलत असलेल्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावर आढळून आलेले परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांनी हस्तगत केले. पीडितेची वैद्यकीय तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. पोलिसांना घटनास्थळावर दुचाकी आढळून आली. आरोपींच्या शोधासाठी पोलीस दबा धरून बसलेले असताना काही वेळेनंतर त्याठिकाणी दुचाकी घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत सर्व आरोपींची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ कैलास गायकवाड (२३), संदीप अशोक पीठे (२४), राजेंद्र दीपक गांगोडे (२६) व आकाश शंकर सिंग (२४, सर्व रा. इंदिरानगर वणी) या चौघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.