पंचवटी : नाशिकरोड परिसरातील उपनगर भागात दरोडा टाकल्यानंतर तेथून तपोवन परिसरात दरोडा घालण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या सहा संशयितांच्या टोळीला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी धारदार शस्त्रास्त्रे, मिरची पूड, तसेच एक बोलेरो पिकअप व उपनगर येथून चोरी केलेला गुटखा, बिस्कीटचे पुडे, चॉकलेट, असा सुमारे सव्वासहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांनी तपोवन परिसरातून अटक केलेल्या संशयितांमध्ये तामिळनाडू तसेच औरंगाबाद व निफाड तालुक्यातील संशयित आरोपींचा सहभाग आहे. शुक्रवारी (दि.१५) पहाटे ४ वाजेच्या सुमारास पोलिसांनी तपोवन ते बळीमंदिर दरम्यान असलेल्या रुक्मिणी लॉन्ससमोर केलेल्या कारवाईत सहा संशयितांविरोधात दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडगाव येथील तपोवन परिसरात काही संशयित दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ परिसरात सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता ओझर जानोरीला पळून गेलेल्या उर्वरित त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेण्यातही पोलिसांना यश आहे. त्यांनी उपनगर हद्दीतील खोडदेनगर येथे दरोडा टाकल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मुद्देमालही हस्तगत केला.पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये भाल्या कृष्णा हरिजन, (तामिळनाडू), आनंद विजय भंडारे, विजय वाल्मीक गायकवाड, जावेद रसूल पिंजारी सर्व रा. पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) यांच्यासह औरंगाबाद येथे राहणारे समीर हसन शाह मंजूर रसूल पिंजारी आदींना अटक केली आहे. यातील मंजूर रसूल पिंजारी याच्यावर बडगाव, फुलांबरी, वाळींज, भोकरदन, हवेली आदि ठिकाणी दरोडा, चोरी, जबरी चोरी अशाप्रकारचे विविध सात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरोड्याच्या तयारीत फिरणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 1:30 AM