मंगळवारी (दि.२३) पहाटे दिंडोरी तालुक्यातील आशेवाडीत एका ट्रकचालकाला दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक देत रोकड तसेच मोबाईल लुटले व संशयित दुचाकीवरून नाशिक शहराकडे येत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानंतर रात्रगस्तीवर असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भागत यांनी गुन्हे शोध पथकाला ‘ॲलर्ट कॉल’ देत सापळा रचण्यास सांगितले. त्यानंतर संशयित अन्य मार्गाने पळून जाण्याची शक्यता लक्षात घेत पंचवटी पोलिसांनी एका पथकाला आशेवाडीच्या दिशेने रवाना केले. दरम्यान, एका बोलेरो जीपच्या चालकाने पोलीस वाहनाला बघताच त्यांना थांबण्याचा इशारा करत रस्त्यावर थांबिवले. या जीपचालकाने पोलिसांच्या पथकाला त्याच्यासोबत घडलेल्या लुटीचा थरार सांगितला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तेथील जवळपास असलेल्या हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले त्यात दरोडेखोर दिसून आले. टोळीत सराईत गुन्हेगार नकुल परदेशी असल्याचे कर्मचारी विलास चारोस्कर यांनी ओळखले त्यानंतर तत्काळ तपासचक्रे फिरवून पोलिसांनी सिडकोतून चौघांना ताब्यात घेत चौकशी केल्यावर वाहनचालकांची लूट केल्याचे संशयितांनी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या संशयितांविरुध्द यापुर्वीही म्हसरुळ, अंबड, दिंडोरी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याचे सुत्रांनी सांगितले.
--इन्फो--
....अशी आहे गुंडांची टोळी
संशयित नकुल रवींद्र परदेशी (२१,रा.हेडगेवारनगर, त्रिमुर्ती चौक), गौरव अरुण माळी, (२१, परदेशी चाळ, हनुमानवाडी), मयूर रत्नाकर पाचोरे (२५, रा.मेहेरधाम पेठरोड), प्रणव विनोद शेवाळे (१९,रा. कामटवाडे, सिडको), शुभम राजू पाटील (२१, रा.श्रीकृष्ण चौक सिडको), निलेश मदन गर्दे (२२, रा.मटाले फार्म, सिडको) या सहा संशयितांच्या टोळीला बेड्या ठोण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यांना पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी म्हसरुळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.