नाशिक : वणी-सापूतारा महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत लूटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या हरिश्चंद्र शेवरे याच्याकडून ३ जिवंत काडतुसे व मोबाइल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील खुंटीचा पाडा येथील रहिवासी जीवन गायकवाड हे त्यांचेकडील मारुती सेलेरिओ कारने घरी जात असताना वनारे फाटा परिसरात दि. १९ नोव्हेंबर २०१९ रोजी मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात चार जणांनी त्यांच्या कारला मोटारसायकली आडव्या लावून हॉकी स्टीकने पायावर व अंगावर बेदम मारहाण करून कारसह लॅपटॉप व मोबाइल असा एकूण २ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला होता. त्यानंतर लुटलेली कार पेट्रोल भरण्यासाठी गोळशी फाटा परिसरातील आरती पेट्रोलपंपावर आणली. त्या ठिकाणीही पेट्रोलपंपावरील व्यक्तींना पिस्तूलचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण करून ५००० रुपयांची रक्कम जबरीने लुटून नेली होती. या दोन्ही घटनांबाबत वणी व दिंडोरी पोलीस ठाण्यांमध्ये जबरी लुटमारीचे गुन्हे दाखल होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही घटनास्थळांना भेट देऊन अज्ञात आरोपींचे पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचे वर्णनाशी साम्य असलेले गुन्हेगारांची पडताळणी करून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.४) पेठ रोडवर गोळशी शिवारात सराईत गुन्हेगार दिंडोरीतील वाळुंजे येथील हरिश्चंद्र कचरू शेवरे (३१) याला रात्रभर सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुजरात राज्यातील त्याचे साथीदार ब्रिजेश सोमदेव राय व दीपक मराठे आणि दिंडोरीतील वारे येथील बाळू तुकाराम पानडगळे व देवीदास सुरेश पानडगळे यांच्यासह वणी-सापूतारा महामार्गासह गुजरातमध्येही अशाप्रकारच्या लुटमारीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.