जबरी लूटप्रकरणी उपनगर कॅनॉल येथील कुणाल प्रेमलाल पटेल आणि निलगिरी बाग झोपडपट्टीतील रवी बाळू दिवे या दोघांसह दोन विधी संघर्षित बालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी नांदूर येथे राहणारा रोशन रमेश निमसे हा त्याचा मित्र आनंद दिघे याच्यासमवेत जत्रा हॉटेल लिंकररोडने दुचाकीवरून जात असताना समोर आलेल्या रिक्षा क्रमांक ६४५४ मधील चार संशयितांनी रस्त्यात रिक्षा आडवी लावून निमसे यांच्या गाडीची चावी काढत मारहाण, शिवीगाळ करत खिशातील मोबाईल, साडेपाच हजार रुपये, चांदीचा गोफ असा २३ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.
लूटमारीच्या घटनेनंतर निमसे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी तत्काळ संशयितांचा शोध घेण्याबाबत गुन्हे शोध पथकाला आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर रिक्षा जप्त करून चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी लूटमार केल्याची कबुली दिली.