येवला : तालुक्यातील दुचाकीचोरांची टोळी तसेच अवैध शस्र व रस्ता लुटीतील आरोपींना ताब्यात घेण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील खेडोपाडी चोरीच्या दुचाकी कमी किमतीत विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २५ नोव्हेंबर रोजी खबर्याने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील विखरणी येथील हसन उर्फ गोट्या रशिद दरवेशी (१९) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे घराजवळ लावलेल्या दुचाकीबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने त्याचे मालेगाव येथील साथीदार खलील उर्फ कालू अहमद निहाल अहमद ( ३७), अनिस रहेमान अन्सारी (४२ रा. गोल्डननगर, मालेगाव) यांच्यासह मालेगाव, चांदवड, येवला, कोपरगाव, अहमदनगर, पाचोरा येथून दुचाकीचोरी केल्याची कबुली दिली. यातील दोन आरोपींना मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आले, तर या तिन्ही आरोपींकडे दुचाकीचोरीचा सखोल तपास केला असता त्यांनी राजस्थान राज्यातील साथीदार रमजान मन्सुरी व सद्दाम मन्सुरी (रा. छपरा, जि. भिलवाडा) यांच्या मदतीने जिल्ह्यातील बहुतांश भागात दुचाकीचोरी केल्याचे उघड झाले आहे.
सदर आरोपी व त्यांचे साथीदार विहीर खोदकाम करण्यासाठी विविध ठिकाणी वास्तव्यास होते. यातील आरोपी हसन उर्फ गोट्या दरवेशी व इतर दोघांच्या ताब्यातून सहा बजाज प्लॅटिना, चार हिरो एचएफ डीलक्स, २ टीव्हीएस स्पोर्ट, २ बजाज डिस्कव्हर, २ स्पेलंडर, १ बजाज सीटी, १ हिरो आय स्मार्ट, १ ड्रीम युगा, १ व्हीकटर अशा ४ लाख २६ हजार रुपये किमतीच्या २० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे या आरोपींकडून विविध पोलीस स्थानकातील एकूण सात गुन्हे उघडकीस आले असून, या आरोपींच्या राजस्थान येथील साथीदारांचा पोलीस कसोशीने शोध घेत आहे, तर अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली गेली आहे.