ममदापूर : येथे सोमवारी सकाळी एका हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ममदापूर राखीव वनक्षेत्रालगत असणाºया नाना चंदू वाघ यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत मृत झालेले हरीण आढळून आले. हरीण साधारण दहा ते बारा दिवसांचे असून, अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले असावे, असा अंदाज आहे. विहिरीत पाणी जास्त प्रमाणात असल्याने ते हरीण विहिरीतून काढण्याअगोदर मृत झाले होते. मृत हरणाला स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाच्या अधिकाºयांनी विहिरीतून काढून पंचनामा करून दफन केले. यावेळी वनअधिकारी अशोक काळे, वनसेवक पोपट वाघ व वन्यजीव संरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते.दोन दिवसापूर्वीही याच भागात तरसाचा मृत्यू झाला होता. या राखीव वनक्षेत्राला बंदिस्त करावे जेणेकरून अशा घटना थांबवता येतील, अशी मागणी ममदापूर येथील छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने दिनेश राऊत, देवीदास गुडघे, गोरख वैद्य, हिरामण सदगीर, जालिंदर जाधव, आबासाहेब केरे, गणेश गायकवाड, प्रकाश वनसे, ज्ञानेश्वर काळे आदींकडून होत आहे.मानवी वस्तीकडे धाव ममदापूर परिसराला राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. उन्हाळ्यात तर हरणे अन्नपाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत असतात, कधी अंदाज न आल्याने किंवा कधी कुत्री मागे लागल्याने हरणे पळत सुटतात व विहिरीत पडतात.
विहिरीत पडून हरणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:23 AM