विलास भालेराव
भगूर शहरात विकासाची गंगा वाहत असली तरी काही समस्या गावाला भेडसावत आहेत. त्यामध्ये भगूर नगरपालिकेचा दवाखाना बंद झाला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू, डेंग्यूसारखे आजार गावात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे. जनतेकडून अग्निशमन कर रूपाने गोळा केला जातो. अग्निशमन गाडी विकत घेतली. मात्र प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने अग्निशमन यंत्रणा ठप्प झालेली आहे. दुसऱ्याच्या भरवशावर आग विझवायची वेळ भगूरकरांवर आहे. भगूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांना सोयी-सुविधा मिळाली नाही. तरी कृषी उत्पन्न बाजार समिती येणे गरजेचे आहे. भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक आहे. पालिकेने, राजकीय नेत्यांनी पाठपुरावा करून ते राष्टÑीय स्मारक करणे गरजेचे असून, त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल. येत्या दशकात भगूर शहरात मोठ्या प्रमाणात विकासगंगा वाहणार असून, शहराचा कायापालट होत आहे. भगूरला तालुक्याचा दर्जाही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु भगूरचे मूळ व्यापारी, व्यावसायिक, नोकरी करणारे नावलौकिक बरेचशे नागरी कुटुंबे नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प आणि विशेषत: विजयनगर परिसरात कायमस्वरूपी राहाण्यास गेल्याने केवळ मुत्सदी, बलाढ्य राजकारणी नेत्यांनी भगूर नगरपालिकेचे अस्तित्व अबाधित ठेवून भगूरच्या वैभवात भर घालीत आहेत.१०० वर्षांपूर्वी चार गल्ल्यांचे आणि २ ते ३ हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या भगूर गावाला विकासाचा खरा आकार सन १९२५ मध्ये भगूर नगरपालिका स्थापन झाल्यावर आला. जसजशी भगूरची लोकसंख्या वाढत गेली तसा गावाचा विकास होत गेला. हळूहळू झोपड्या जाऊन कौलारू घरे आली. त्यानंतर सिमेंट, पत्र्याची वसाहती निर्माण होऊन चार गल्ल्यांच्या गावाचे आता १७ प्रभाग होऊन भगूर नगरपालिकेत विकासासाठी आपला वॉर्डाचा प्रभागाचा हक्काचा नगरसेवक असे १७ नगरसेवक शहराच्या विकासाचा विचार करू लागले. आता भगूर शहर हे संपूर्ण काँक्रीटीकरण झाले. एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी भगूरचा नगराध्यक्षांना मोर्चाद्वारे बांगड्याचा आहेर देणाºया महिलांना मुबलक पाणी मिळते आहे, तर बहुतांश अत्यावश्यक सुविधा नागरिकांना मिळत असल्याने काहीसा विकास झाल्याचे वाटत आहे.तरीपण येत्या २०२० ते ३० या दशकात नाशिकरोड, देवळाली कॅम्प आणि परिसरातील गावामध्ये भगूरचा गावाचा आकर्षक विकास होण्याच्या मार्गावर असून, भगूरमध्ये मोठमोठे रोजगार निर्माण होऊन झोपडपट्टी मुक्त भगूर शहर नावारूपाला येऊन भगूर बाहेर गेलेले नागरिक, व्यापारी येत्या दशकात पुन्हा आपल्या भगूर नगरीत राहाण्यास येण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. भगूरच्या दळणवळण विकासाला हातभार लागला तो म्हणजे नुकताच नव्याने १५ कोटींचा भगूर रेल्वेगेट क्रॉसिंग उड्डाणपूल आणि चार कोटींचा जुना रेल्वे मोरी पूल यामुळे भगूरकरांचे दळण-वळण सुविधा वाढेल. शिवाय इतर गावांतील नागरिक खरेदी-विक्रीसाठी याच सुसज्ज मार्गाने येण्यास पसंत करतील आणि इगतपुरी, सिन्नर, नाशिक या तीन तालुक्याचे व्यापारी केंद्र म्हणून भगूर शहरात सुरुवात होणार आहे. यापूर्वी १५ खेड्यातील नागरिक भगूरमध्ये येत होते. परंतु रस्ते इतर सुविधांमुळे दुरावत चालले होते. परंतु त्यांना निश्चित दिशा मिळून वाटचाल सुरू होत आहे. तसेच भगूर नगरपालिकेच्या वतीने व्यापाऱ्यांसाठी चार कोटी रुपयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर डेली मार्केटच्या कामाला नुकतीच सुरूवात झाली आहे. २ ते ३ वर्षात छानपैकी होणार आहे. त्यामुळे परिसरातील विविध खेड्यातील शेतकरी येथे शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येणार. तसेच खरेदीसाठी इतर गावातील नागरिक निश्चित येणार त्यामुळे भाजी मार्केट समस्या संपणार त्याचा भगूर विकासाला हातभार लागणार. गेल्या चार-पाच वर्षापासून भगूरला स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर उद्यानाचे ५ ते ६ कोटीचे काम चालू आहे. जसजसे शासनाचे अनुदान येत राहील तसे त्यांचे काम पूर्णत्वास येईल म्हणजे भविष्यात हे सावरकर उद्यान पर्यटकांसाठी खुले राहील त्यामुळे वैभवात भर पडेलच.