नाशिक : नाशिक शहरासह गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूर धरणामधून गोदापात्रात होणारा विसर्गही कमी करण्यात आला आहे. पाच हजार क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग रविवारी (दि.३०) दुपारी तीन हजाराने कमी करण्यात आला. साडेचार वाजेपासून नदीपात्रात दोन हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू होता. शनिवारी सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत गंगापूर धरणातून ५ हजार १०९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हा विसर्ग रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत कायम राहिला. त्यानंतर जलसंपदा विभागाने विसर्ग कमी करत धरणाचे दरवाजे काही फुटापर्यंत खाली केले. दुपारी साडेचार वाजेपासून पुढे गंगापूर धरणातून केवळ दोन हजार ५५ क्यूसेक पाणी नदीपात्रात प्रवाहित होते. शनिवारी दुपारपासून शहरात पावसाने उघडीप दिली आहे. रविवारीही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे नदीपात्रात प्रवाहित होणाºया पाण्याच्या पातळीतही तीन हजार क्यूसेकने घट झाली आहे. होळकर पुलाखालून दुपारी ४ हजार ८८८ क्यूसेक पाणी प्रवाहित आहे. पाच वाजेनंतर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे होळकर पुलाखालून पुढे नदीपात्रातील पाण्याची पातळीही कमी झाली होती. गोदापात्रातील पाण्याची पातळीदेखील कमी झाली होती. गंगापूर धरणाचा जलसाठा ४ हजार ५४४ दलघफू इतका असून, धरण ८१ टक्के भरले आहे. शहर व परिसरात दिवसभरात ०.७ मि.मी. इतका अत्यल्प पाऊस झाल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने केली आहे.
गंगापूर धरणातून विसर्ग घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:22 AM