नाशिक : नवरात्रोत्सवाच्या अष्टमी-नवमीनिमित्त शुक्रवारी (दि.२३) गंगाघाट येथील सांडव्यावरच्या देवीचे रस्त्यावर उभे राहून दर्शन घेत असलेल्या एका महिला भाविकाच्या पर्समधील दहा हजाराची रोकड व मंगळसुत्र भर दुपारी तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने भाविकांच्या रांगेचा फायदा घेत गायब केल्याची धक्कादायक घटना घडली.
नवरात्रोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे शहर व परिसरातील सर्वच देवी मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. काही देवी मंदिरांच्या बाहेर भाविक श्रध्देपोटी रस्त्यावर उभे राहून दर्शन घेत होते. शुक्रवार व शनिवारी शहरातील काही देवी मंदिरांसमोर भाविकांची गर्दी जमली होती. यावेळी महिलांची संख्या जास्त होती. गंगाघाटावरील सांडव्यावरच्या देवीचे दर्शन घेत असलेल्या भाविकांच्या रांगेत फिर्यादी पुष्पा परशराम (३५,रा. रोहिणीनगर, पंचवटी) यादेखील उभ्या होत्या. यावेळी एका अज्ञात इसमाने त्यांच्या पाठीमागे उभे राहत पर्सची चैन उघडून त्यामध्ये ठेवलेली दहा हजारांची रोकड, तसेच १० हजाराचे मंगळसुत्र लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.