नाशिक :गंगापूर धरण समुहाच्या क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. शनिवारी गंगापूर धरणाच्या क्षेत्रात ९५ तर काश्यपीच्या परिसरात ४६ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच रविवारी (दि.६) मध्यरात्री गौतमी धरणाच्या परिसरात ४६ मिमी पाऊस पडल्यामुळे धरणसाठ्यात पूरपाणी वाढल्याने गंगापूर धरण आता ९६.२५टक्के इतके भरले आहे.गंगापूर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस शनिवारपासून होत आहे. यामुळे धरणाच्या जलसाठ्यात हळुहळु वाढ होऊ लागली आहे. गंगापूर धरणातून सध्या मागील चार ते पाच दिवसांपासून विसर्ग पुर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. धरणसाठा सुमारे ५ हजार ४२० दलघफू इतका झाला आहे. यामुळे धरण ९६.२५ टक्के इतके रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत भरले होते. गंगापूर समुहात रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाल्यास पुन्हा विसर्ग सोडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण शहरातसुध्दा रविवारी दुपारी अर्धा तास जोरदार पावसाने झोडपले. हवामान खात्याकडून सलग मागील दोन दिवसांपासून दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला जात आहे. यामुळे धरणक्षेत्रांत पर्जन्यवृष्टी वाढल्यास गोदावरीच्या पात्रात विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे नदीकाठाच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील धरणांची स्थिती अशी....नाशिक जिल्ह्यातील दारणा ९६.६८ टक्के, मुकणे ८३.२० टक्के, वाकी ८६.८८ टक्के,कडवा, भाम, भावली, भोजापूर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या प्रत्येकी १०० टक्के, काश्यपी ६७.६५ टक्के, गौतमी ७९.८० टक्के, आळंदी ७९.५४ टक्के, पालखेड ८८.४८ टक्के इतके भरले आहे.
गंगापूर धरण ९६ टक्के भरले; दोन दिवसांपासून दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 4:02 PM
धरणक्षेत्रांत पर्जन्यवृष्टी वाढल्यास गोदावरीच्या पात्रात विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे नदीकाठाच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देधरणसाठा सुमारे ५ हजार ४२० दलघफू