नाशिक : नाशिक जिल्ह्यातील काही भागांना परतीच्या पावसाने आठवडाभरापूर्वी झोडपून काढले. मात्र इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक सुरगाणा पेठ या तालुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिली असून, त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. सध्या हे धरण 99 टक्के भरले असून, धरणाचा जलसाठा 5 हजार 565 दलघफू इतका आहे.आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे तूर्तास गंगापूर धरणातून विसर्ग हा थांबवला गेला आहे. गंगापूर धरण क्षेत्रात देखील पावसाची विश्रांती आहे. समूहातील गौतमी त्र्यंबकेश्वर काश्यप या भागात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. आंबोली परिसरात पावसाची अधूनमधून जोरदार हजेरी सुरू असल्यामुळे काही प्रमाणात गंगापूर धरणात पाण्याची आवक होत असल्याने धरण साठा हा वाढता वाढत आहे. बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरण 98. 85% भरले. पहाटेपर्यंत आंबोली परिसरात 16 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.गंगापूर समूहातील काश्यपी 71 तर गौतमी गोदावरी 85 टक्के इतके भरले आहे. मागील 4 दिवसांपूर्वी 268 क्यूसेक इतका विसर्ग सुरू होता; मात्र पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने आता विसर्ग थांबविला गेला आहे. गंगापूर धरण भरल्याने नाशिककरांचा वर्षभराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला असून, पाणीकपात टळली आहे. तसेच मुकणे धरण 84 टक्के तर दारणा 99.17इतके भरले आहे. जिल्ह्यातील भावली, भाम, वालदेवी, वाकी, कडवा, भोजपूर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या हे लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. दारणा धरणातून होणारा विसर्गही थांबविला गेला आहे.जिल्ह्यातील पर्जन्यमान दृष्टीक्षेपातनाशिक शहरातसुद्धा पावसाने विश्रांती घेतली आहे. शहरात आतापर्यंत या हंगामात 811.5मिमी पर्यंत पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात सरासरी 1075 मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक 3057 मिमीपर्यंत पाऊस पडला तर त्र्यंबकेश्वरला 2 हजार 166, पेठमध्ये 2हजार 45 मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला. सर्वात कमी देवळा तालुक्यात 422 मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकली. मागील वर्षी जिल्ह्यात हंगामात सरासरी 1 हजार 427 मिमीपर्यंत पाऊस पडला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान कमी राहिले.
गंगापूर धरण 99 टक्के भरले; नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 2:28 PM