नाशिक : गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणातून ८१२९ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. पारंपरिक पूरमापक समजल्या जाणाऱ्या नदीपात्रातील दुतोंड्या मारुतीच्या खांद्यापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे, तर नदीवरील रामसेतू पुलाला पाणी लागले आहे. काठलगतचे नारोशंकराचे मंदिरही अर्धेअधिक पाण्यात बुडाले असून नदी रौद्ररूप धारण करीत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक विसर्ग असून, नाशिककरांच्या पाण्याची देखील चिंता मिटली आहे.
मंगळवारी मध्यरात्रीपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस बरसल्याने बुधवारी सकाळी साडेपाच टीएमसी क्षमतेचे गंगापूर धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, धरणातून गोदावरीत पाणी झेपावले आहे. बुधवारी सकाळी ८.३० वाजता धरणातून १००० क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. त्यानंतर त्यामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली. सकाळी ११ वाजता २००० हजार क्युसेकने पाण्याचा वेग वाढविण्यात आला, तर तासाभरानंतर एकूण विसर्ग ४००० क्युसेक इतका करण्यात आल्याने नदीची पातळी झपाट्याने वाढल्याने पूर वाढला. अवघ्या तासाभरानंतर पुन्हा विसर्गाचा टप्पा वाढविण्यात येऊन ६००० क्युसेक तर दुपारी तीन वाजेनंतर ८१२९ क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीपात्राची पातळी वाढल्याने काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
काठावर असलेले नारोशंकर मंदिर अर्धेअधिक बुडाले, तर गांधी तलावालगत असलेल्या दशक्रिया छत्रीच्या छताला पाणी लागले. देवमामलेदार मंदिराचेही दाेन मजले पाण्याखाली बुडाले, तर गंगा-गोदावरी मंदिरही पाण्याखाली आहे.
--इन्फो--
हंगामात दुसऱ्यांना विसर्ग
या हंगामात गंगापूर धरणातून दोनदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गेल्या ११ व १२ सप्टेंबरला झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे ६ हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. बुधवारी (दि.२२) राेजी ८ हजारांपेक्षा अधिक विसर्ग करण्याची वेळ आली. गंगापूर धरण क्षेत्रातील काश्यपी ९२, गंगापूर ११५, अंबोली ७९, गौतमी ८५ तर त्र्यंबकमध्ये ४३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाल्याने गंगापूर धरणात पाण्याची मोठी आवक झाली