नाशिक : त्रंबकेश्वर तालुक्यामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पूरपाण्याची आवक धरणात होऊ लागली आहे. रविवारी (दि. १७) गंगापूर धरणात जलसाठा ७७ टक्के इतका झाला, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली. नाशिककरांवर दाटलेले पाणीकपातीचे ढग आता नाहीसे झालेले आहे.रुसलेल्या वरुणराजाची महिनाभरापासून कृपादृष्टी होण्याची वाट नाशिककर आतुरतेने बघत होते. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरीदेखील चिंतातुर झाले होते. मात्र गेल्या आठवडाभरापासून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्येही पावसाचा जोर कायम असल्याने दारणा, गंगापूर धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे.दारणा धरणातून विसर्गही केला जात आहे. नांदूरमधमेश्वर धरणात पावसाचे पाणी व दारणाचे पाणी पोहोचत असल्याने या धरणातून विसर्ग केला जात आहे. नांदूरमधमेश्वर हा लघुप्रकल्प असून, हा बंधारा ८० टक्के भरला आहे.त्यामुळे सातत्याने यामधून गोदावरीच्या पात्रात विसर्ग केला जात आहे. मराठवाड्याची तहान भागण्यास यामुळे मदत होणार आहे.
गंगापूर धरणातील जलसाठा ७७ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 1:15 AM