गंगापूर : वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेल्या गंगापूर रोडवर सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने हॉटेल्स, लॉन्सच्या बाहेर सर्रासपणे चारचाकी वाहने अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विद्या विकास सर्कलपासून ते थेट गंगापूर गावापर्यंत रस्त्यालगत असलेले हॉटेल, लॉन्स यांच्या व्यवसायामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.गंगापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक इमारती असून, ग्राहकांची सातत्याने गर्दी असते. ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडचण होत असतानाही वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असून, पार्किंगची अधिकृत जागा नसनतानाही महापालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने रस्त्याचा अनधिकृत वापर वाढला आहे.नाशिकहून गंगापूर रोडमार्गे गिरणारे, हरसूल, तसेच गंगापूर गोवर्धनकडे सातत्याने वाहतूक सुरू असते. नेहमीच गजबजलेला गंगापूररोड हा आता अघोषित पार्किंगमुळे अधिक धोक्याचा बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनेक व्यवसायांबरोबर हॉटेल्स, मॉल, दारू दुकाने, लॉन्स व खाद्याच्या गाड्यांनी हा रस्ता प्रचंड गजबजलेलाअसतो.सायंकाळी सहा वाजेनंतर या मार्गाने अनेक प्रवासी दुचाकीस्वार, बसगाड्या, चारचाकी वाहने सतत धावत असतात. याच मार्गावर विविध माध्यमिक शाळा व महाविद्यालये आहेत. औद्योगिक वस्तीकडून येणाऱ्या-जाणाºया वाहतुकीमुळेही सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. विद्यार्थी कामगार यांच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या सततच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावरील आडवी उभी असलेली चारचाकी वाहने नागरिकांच्या दृष्टीने कायमच डोकेदुखी ठरली आहे. उन्हाळ्यात लॉन्समधील पंचतारांकित विवाह सोहळ्यांमुळेही हा रस्तासामान्य वाहतूकदारांसाठी अत्यंत डोकेदुखी ठरला आहे. गंगापूर रोडच्या बेशिस्त बिनधास्त पार्किंगला चाप लावणार कोण हा सवाल नागरिक व प्रवासी करीत आहेत.गंगापूररोडवर रिक्षाप्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करीत असताना रात्री या रस्त्याला दुतर्फा बेशिस्तपणे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांमुळे हा रास्ता अरुं द होतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून, अपघातांचे प्रकारही घडलेले आहेत. वाहनांच्या गर्दीतून मार्गक्रमण करावे लागते.- संजय परदेशी, रिक्षाचालकगंगापूररोड आधीच अरुंद आहे. त्यात रस्त्याच्या मधोमध दुभाजक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने व्यावसायिकांची गर्दी, वाढते हॉटेल्स, बार अॅन्ड रेस्टोरंट यांच्यामुळे नागरिकांना आपली वाहने चालवताना जीवघेणी कसरत करावी लागते. या रस्त्यावरील पार्किंगला कुठलीही शिस्त नाही.- आबा पाटील, रहिवासी