नाशिक : शहरातील उच्चभ्रू लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळख असलेल्या गंगापूर रोडवरील नरसिंहनगर भागात बिबट्याने रविवारी (दि.१८) सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास एन्ट्री केली अन् रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सुमारे साडेतीन तास चाललेल्या थरारानंतर बिबट्याला बेशुद्ध करण्याकरिता वनविभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आणि रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.गंगापूर रोडवरील नरसिंहनगरचा परिसर हा दाट लोकवस्तीचा आहे. येथील मोकळ्या भूखंडांवरील झाडीझुडपांमध्ये बिबट्याने आश्रय घेतला होता. घटनेची माहिती वनविभागाला समजताच, नाशिक पश्चिम वनविभागाचे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याचा माग काढण्यास पथकाला यश आले. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही बिबट्या धावताना दिसत असल्याचा भक्कम पुरावा वनखात्याच्या हाती लागला. यामुळे पथकाला याच भागात तळ ठोकून शोधमोहीम सुरू केली. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी या बचाव मोहिमेचा मोर्चा सांभाळलला. पत्र्याच्या शेडमध्ये झाडीत बिबट्या दडून बसल्याची खात्री पटली. येथे काही मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर रहिवाशांचा कल्लोळ सुरू होताच, बिबट्याने तेथून मागील बाजूस असलेल्या कुंपनावरून थेट अक्षरधाम सोसायटीच्या पार्किंगमध्ये उडी घेतली. बिबट्या एका जागी स्थिर राहत नसल्याने, त्यास बेशुद्ध करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. चाणक्य इमारतीत उडी घेत, जिन्याखालील मोकळ्या जागेत जाऊन बिबट्या दडून बसला असता, पशुवैद्यकीय अधिकारी वैशाली थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचाऱ्यांनी त्यास अचूकरीत्या 'डार्ट' मारला. काही मिनिटांतच बिबट्या बेशुद्ध होताच, त्याला मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले वनरक्षक, वनमजुरांनी स्ट्रेचरवरून रेस्क्यू वाहनातील पिंजऱ्यात टाकले. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले.-वनक्षेत्रपाल भदाणे किरकोळ जखमीबिबट्याला रेस्क्यू करत असताना, ट्रॅन्क्युलाइज गनद्वारे त्यास डार्ट मारण्याच्या तयारीत असलेल्या वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्यावर अक्षरधाम इमारतीच्या पार्किंगमध्ये बिबट्याने चाल केली. या हल्ल्यात ते सुदैवाने बचावले. बिबट्याने त्यांच्या पायाच्या पोटरीला पंजा मारल्याने ते किरकोळ स्वरूपात जखमी झाले.
गंगापुररोडवासीयांचा उडाला थरकाप : साडेतीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:07 PM
गंगापूर रोडवरील नरसिंहनगरचा परिसर हा दाट लोकवस्तीचा आहे. येथील मोकळ्या भूखंडांवरील झाडीझुडपांमध्ये बिबट्याने आश्रय घेतला होता. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
ठळक मुद्देवनविभागाचे शर्थीचे प्रयत्न यशस्वी