नाशिक - सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीत सुमारे 21 मंडळांनी आपल्या आकर्षक देखावे व पारंपारिक ढोल पथकांचा सहभाग घेतला आहे. शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, गजानन शेलार, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह शहरातील विविध राजकीय नेते सहभागी झाले आहेत. तसेच अग्रभागी नाशिक महापालिका कर्मचारी गणेशोत्सव समितीचा गणपती असून त्यापाठीमागे रविवार कारंजा मित्र मंडळ, गुलालवाडी व्यायामशाळा मित्र मंडळ, भद्रकाली कारंजा मित्र मंडळाचा श्रीमंत साक्षी गणेश, श्रीमान सत्यवादी मित्रमंडळाची भव्य मूर्ती, सूर्यप्रकाश नावप्रकाश मित्र मंडळचा नाशिकचा राजा, सरदार चौक मित्र मंडळ, रोकडोबा मित्र मंडळ, मेन रोड येथील शिव सेवा मित्र मंडळ, शिवमुद्रा मित्र मंडळाचा मनाचा राजा, मुंबई नाका युवक मित्र मंडळ, जुने नाशिक दंडे हनुमान मित्र मंडळ, युनायटेड मित्र मंडळ, शैनेश्वर युवक समिती, नेहरू चौक मित्र मंडळ, नविन आडगाव नाका सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, श्री गणेश मूकबधिर मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, द्वारकामाई मित्र मंडळ सहभागी आहेत. विविध मंडळांकडून पारंपरिक मर्दानी खेळ सादर केले जात आहेत. तसेच गुलालवाडी व्यायामशाळेचे चिमुकल्यांचे लेझीम पथक, यशवंत व्यायाम शाळेच्या चिमुकल्यांचे मल्लखांब प्रात्यक्षिक लक्ष वेधून घेत आहेत.विसर्जन मिरवणूक जुने नाशिक, वाकडी बारव, दादासाहेब फाळकेरोड, महात्मा फुले मंडई, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली भाजीबाजार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, एम.जी.रोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट गल्ली, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, कपालेश्वर मंदिर, भाजीबाजार, म्हसोबा पटांगणावरून गोदाकाठालगत विसर्जन ठिकाणी पोहचणार आहे.
श्री काशी विश्वनाथ महाकाल डमरू दल
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत शिवसेना युवक मित्रमंडळाच्या वतीने सहभागी केलेले "श्री काशी विश्वनाथ महाकाल डमरू दल" या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. शिवभक्तांच्या या डमरूच्या तालामुळे मिरवणूक बघण्यास गर्दी झाली .