नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, गंगापूर धरणातून ३९९७ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदीकाठावरील बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानदारांची धावपळ झाली, तर अनेकांनी दुकाने सुरक्षित स्थळी हलविली. दरम्यान, सायंकाळी सात वाजेपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले होते.मागील आठवड्यात सलग चार दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणांची पातळी वाढली होती तर सर्वत्र पूर आला होता. त्यानंतर पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने पूरही ओसरला होता. गुरुवारपासून पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. रात्रीपासून सुरू असलेला पाऊस आणि सकाळी ९ वाजता गंगापूर धरणातून ८३२ तर दुपारी तीननंतर ३९९७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि नदीकाठी असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरले. दोन दिवसांपूर्वीच पूर्वपदावर आलेला गोदाकाठ पुन्हा जलमय झाला.
गोदावरी नदीला पुन्हा पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:08 AM