आझादनगर : देशात गोरक्षाच्या नावाखाली अल्पसंख्याक व दलित समाजावर हल्ले करण्यात येत असून, त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार घडणाºया घटनांना रोखण्यात सरकारला अपयश येत आहे. अशा हल्लेखोरांविरोधात कठोर कायदा करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी इन्सानियत बचाव संघर्ष समितीतर्फे मालेगाव ते नाशिक पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी दुपारी ३ वाजता उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शेख बोलत होते. यावेळी समितीचे उपाध्यक्ष भगवान आढाव, नगरसेवक विठ्ठल बर्वे, लतीफ बागवान, अब्दुल कय्युम, शहेजाद अख्तर, हलीम सिद्दीकी आदी उपस्थित होते. आमदार शेख पुढे म्हणाले, २०१४ पासून केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून विविध राज्यात गोहत्या व गोरक्षेच्या नावाखाली ५४ ठिकाणी हल्लेखोरांनी मुस्लीम व दलित समाजाच्या लोकांवर हल्ले केले. त्यात सुमारे २८ निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. केंद्र सरकार असे हल्ले रोखण्यात अपयशी ठरत आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने जनावरे खरेदी-विक्रीच्या केंद्र सरकारच्या परिपत्रकास स्थगिती दिली. याचे स्मरण करून देत घटनेने सर्व समाजाला दिलेल्या अधिकाराला न जुमानता जातीयवादी संघटनांकडून देशातील समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत सरकारचा निषेध करीत अशा हल्लेखोरांवर कठोर कायद्याची निर्मिती करुन त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.समितीचे उपाध्यक्ष भगवान आढाव म्हणाले की, भाजपा सरकारने देशातील विभिन्न समाजाच्या आहारांवर अंकुश ठेवण्याचे काम केले आहे. एकीकडे गोवंश हत्याबंदी केली, तर दुसरीकडे मोदींच्या राज्यातच गुजरातमध्येच मोठ्या प्रमाणावर गायींचा मृत्यू होतोय. गोहत्येच्या नावाखाली मनुष्यांचीच हत्या केली जात आहे. संविधानाने दिलेला अधिकार हिरावून घेणाºयांनी मने साफ करून बोलावे तसे वागावे. दलित समाज जन्मताच संघर्ष करीत आहे. कायद्याने गोहत्याबंदी केली, त्याचे तंतोतंत पालन व्हावे, मात्र गोवंश पाळू नये असे कुठेही म्हटले नाही. अल्पसंख्याकांच्या घरासमोर बांधलेले पाळीव प्राणी कत्तलीसाठीच आहेत असा पोलीस निष्कर्ष कसे काढतात असा प्रश्न उपस्थित केला.दलितांना बरोबर घेत इन्सानियत बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या माध्यमातून येत्या १५ आॅगस्ट रोजी शहरातील शहीदोंकी यादगार ते नाशिक अशी पदयात्रा काढून दि. १९ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी शहरात जनजागृतीसाठी विविध भागात सात सभा घेण्यात येत आहे. पहिली सभा सौलानी चौक येथे होणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
गोरक्षेच्या नावाखाली होणाºया हल्ल्यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:56 PM