नाशिक शहरातील गावठाणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. मध्य नाशिक आणि गावठाणमधील वाड्यांचा प्रश्न जटिल आहे. दरवर्षी जुने वाडे पडत असल्याने जीवित किंवा वित्तहानीदेखील होत असते. त्यामुळे नाशिक शहरात गावठाण क्लस्टर वापरून अधिकाधिक एफएसआय मंजूर करण्याची मागणी होत होती. दरम्यान, २०१७ मध्ये नाशिक महपाालिकेचा दुसरा विकास आराखडा मंजूर झाला तेव्हा त्यात नाशिकमध्ये गावठाण क्लस्टरची स्वतंत्र नियमावली जारी करण्यात येणार आहे, असे नमूद करण्यात आले. दरम्यान, हा विषय गतिमान करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले. २०१८ ते २०२० पर्यंत वेगवेगळ्या कारणांनी रखडलेला हा अहवाल अखेरीस शासनाकडे पाठवण्यात आला आणि नाशिक शहरासाठी आता गावठाण क्लस्टरच्या मंजुरीची प्रतीक्षा होती.
दरम्यान, नाशिक शहरात गावठाण क्लस्टरचा समावेश अगोदरच युनिफाईड डीसीपीआरमध्ये समावेश करण्यात आल्याचे महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यात चार हजार चौरसमीटर क्षेत्रातील मिळकतींचा समुच्चय विकास करता येईल आणि त्यासाठी चार एफएसआयदेखील नमूद करण्यात आला आहे. तथापि, चार हजार चौरसमीटर क्षेत्रातील सर्व वाडे एकत्र करता येतील काय, याविषयी मात्र शंका आहे.
इन्फो..
महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाडेकरी असलेल्या मिळकतीत अशाप्रकारे गावठाण क्लस्टरमध्ये विकास करताना किमान २७.८८ मीटर क्षेत्राची सदनिका प्रत्येक भाडेकरूला द्यावी लागणार आहे.
इन्फो..
गावठाणात सध्या कमी-अधिक रूंदीच्या रस्त्यानुसार चटई क्षेत्र अनुज्ञेय आहे. त्यानुसार बेसिक एफएसआय दोन अनुज्ञेय आहेत. त्यात अतिरिक्त चटईक्षेत्र लाभदेखील मिळू शकेल.