सुदर्शन सारडा।लोकमत न्यूज नेटवर्कओझर : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्या वेळी जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. धुराचे लोळ गावात सर्वत्र जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुखाच्या झोपेत दुर्गंधीयुक्त प्राणवायूमुळे अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.सध्या ओझर येथे सर्वाधिक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे कचरा जाळण्यामुळे होणाºया त्रासाचा. येथील जुन्या सायखेडा रोडजवळील अनुसया पार्कला लागून असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीने अनेकजण हैराण झाले आहेत. त्यामुळे परिसरात आजारपण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.ओझर येथे बाणगंगा नदीकिनारी मारु ती वेस स्मशानभूमीच्या मागील बाजूसे व जुन्या सायखेडा रोडला लागून कचरा डेपो आहे. गावातील तसेच उपनगरांतील सर्व कचरा घंटागाडीने तेथे आणून टाकला जातो. परंतु गावचा वाढता विस्तार व दररोज हजारो किलो जमा होत असलेला ओला व सुका कचरा हा सदर ठिकाणी आणून टाकला जात असताना त्याची विल्हेवाट रात्री जाळून लावण्यात येते. मात्र हा प्रयोग नागरिकांच्या जिवावर उठला आहे. ओला-सुका कचरा एक होत असल्याने जागेची प्रचंड कमतरता भासत आहे. कचरा डेपोला लागूनच वसाहत आहे, तर नदीच्या पलीकडे शेती तसेच शेलार, शिंदे, कदम वस्ती आहे. या आधीही जेसीबीच्या साहाय्याने डम्पिंग केले जात होते. त्यावेळी प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत होता. सध्या सायंकाळनंतर दररोज कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरात धुराचे लोळ परसच आहे.या दुर्गंधीमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कचरा डेपोला लागून सार्वजनिक शौचालय आहे. कुबट दुर्गंधीचा सामना लहान मुलांपासून वयोवृद्धांनादेखील करावा लागत आहे. गावात दिवसभर दुर्गंधी पसरलेली असते. अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. प्रशासनाने या समस्येवर गांभीर्याने विचार करून त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.पावले उचलण्याची विनंती आता नागरिक करू लागले आहे जेणेकरून दररोज उद्भवणार्या त्रासापासून सुटका होईल.आजारांना निमंत्रण...कचरा डेपोला लागून वसाहती आहे. अनुसया पार्क, सरकार वाडा, ओम गुरु देव चाळ, तानाजी चौक, चांदणी चौक, शिवाजी रोड, मारु ती वेस, सायखेडा फाटा, राजवाडा, राणा प्रताप चौक, कोळी वाडा आदी ठिकाणच्या रहिवाशांना दुर्गंधीमुळे सायंकाळी बाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे. दूषित धुरांचे लोळ अन त्यात उडणारा ठसक्यामुळे अनेकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या आहेत. हा कचरा डेपो गंभीर आजारांना निमंत्रण देणारा आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वेळीच या प्रश्नी नियोजन केल्यास भविष्यात अडचण निर्माण होणार नाही, असे नागरिकांनी सांगितले.