नाशिक : महापालिकेच्या घंटागाडी कामगारांना सुधारित दराने किमान वेतनाचा फरक आरोग्य विभागाने अखेर अदा करण्यास हिरवा कंदील दाखविल्याने कामगारांना दिवाळीची भेटच मिळाली आहे. गेल्या पावणे दोन वर्षांपासून घंटागाडी कामगार सुधारित किमान वेतनाची थकबाकी मिळण्यासाठी संघर्ष करत होते.शासनाने २४ फेबु्रवारी २०१५ रोजी सुधारित किमान वेतन लागू केले होते. त्यानुसार, घंटागाडी कामगारांनी सदर सुधारित किमान वेतन मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. प्रसंगी कामगारांवर गुन्हेही दाखल झाले. मात्र, घंटागाडी ठेकेदारांनी सदर सुधारित किमान वेतन हे ठेकेदारांकडील कंत्राटी कामगारांना लागू होत नसल्याचे कारण दर्शवित न्यायालयात धाव घेतली होती. अद्यापही प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. परंतु, घंटागाडी कामगारांना सुधारित दराने किमान वेतनाचा फरक अदा करावा, असे निर्देश कामगार मंत्रालयाने महापालिकेला दिले होते. परंतु त्याच्या अंमलबजावणीत घोळ सुरू होता. अखेर दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने घंटागाडी कामगारांना सुधारित किमान वेतनाची थकबाकी अदा करण्याचे आदेश काढले. कर्मचाऱ्यांच्या हाती ६० ते९० हजार रुपये एकरकमी पडणार असले तरी त्यामुळे घंटागाडी कामागरांना एकप्रकारे बोनसच मिळाला आहे. (प्रतिनिधी)
घंटागाडी कामगारांची दिवाळी
By admin | Published: October 28, 2016 11:10 PM