मातोरी : मखमलाबाद येथील मानकरनगर येथील उद्यानाची दुरवस्था झाली असून, महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने लाखो रु पये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी व मुलांना खेळण्यासाठी मानकरनगर येथे उद्यानाची निर्मिती केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरातील एकमेव उद्यान असल्याने याठिकाणी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सायंकाळी परिसरातील नागरिक निवांतपणासाठी तर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा म्हणून आणि लहान बालके येथे खेळण्यासाठी येत असतात, परंतु उद्यानाच्या बकालपणामुळे त्रस्त असलेल्या स्थानिक नागरिकांनी अनेकदा याबाबत महानगरपालिका कार्यालयात तक्र ार करूनही दुर्लक्ष करत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. उद्यानात असलेल्या विहिरीला पुरेशा प्रमाणात पाणी असूनदेखील झाडांना पाणी नसल्याने झाडे पूर्ण वाळून गेली आहेत. पावसाळ्यानंतर उद्यानातील शोभेच्या व इतर वृक्षांना कोठेही पाणी दिल्याचे दिसत नाही, लॉन संपूर्ण वाळून गेली आहे. झाडांची मोडतोड झालेली आहे. त्यासाठी कोठेही सुरक्षा रक्षक किंवा माळी याची नेमणूक केलेली नाही. कंपाउंडची जाळी तोडलेल्या अवस्थेत आहे, तर खेळणींची अवस्था गंभीर झाली असून, पालक बालकांना खेळण्यास मज्जाव करीत आहेत. कारण खेळणी गंजल्याने खेळणे केव्हाही जिवावर बेतू शकते. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे़परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीगेल्या सहा महिन्यांपासून साचलेला कचरा अजूनही उचलेला नाही. अनेकदा मागणी करूनही बसण्यास बाक उपलब्ध होऊ शकले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्यानाच्या समोरच लोकप्रतिनिधींचे निवासस्थान असून, ते उद्यानातील मंदिरात देवदर्शनासाठी येतात तरी देखील त्यांना ही दुरवस्था दिसत नाही का? असा प्रश्न नागरिक करीत आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़
मखमलाबादला उद्यानाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:08 AM