पंचवटी : परिसरातील ठिकठिकाणच्या भागात असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून यंदाही दरवर्षीप्रमाणे गरबा व दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाच्या ठिकाणी तरुणाई दांडिया खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करून गरब्यावर थिरकत असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी दांडियाचे आयोजन केले आहे, अशा मंडळांच्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करून परिसरात सजावट करण्यात आलेली आहे. हिंदी तसेच मराठी गीतांच्या ठेक्यावर तरुणाई तसेच दांडियाप्रेमी दांडिया खेळताना दिसून येत आहे. पंचवटी परिसरातील मेरी, म्हसरूळ, दिंडोरीरोड, फुलेनगर, औरंगाबादरोड, हिरावाडीरोड, सेवाकुंज, सरदार चौक, पंचवटी गावठाण भागात दैनंदिन दांडिया खेळण्यासाठी युवक-युवतींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पंचवटीतील सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी मित्रमंडळ, बंजार माता मित्रमंडळ, कृष्णनगर मित्रमंडळ, सरदार चौक मित्रमंडळ, हिरावाडीतील कै. दत्ताजी मोगरे व दुर्गा महिला मंच, साईराज मित्रमंडळ, मानेनगर येथील तेजस्विनी महिला मंडळ, ओम साई कला क्रीडा मंडळ, अयोध्यानगरी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, दिंडोरीरोड कच्छी लोहाणा मंडळ, शिवाजी चौकातील भगवती शैक्षणिक सामाजिक मंडळ आदींसह परिसरातील नवरात्रोत्सव मंडळातर्फे दांडिया व गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी गरबा खेळण्यासाठी तरुण-तरुणी व दांडियाप्रेमींची गर्दी व्हावी म्हणून बक्षिसांची योजना आखली आहे. यामध्ये बेस्ट दांडिया, गरबा, फॅन्सी ड्रेस, एक मारी, दोन मारी व पाच मारी नृत्याचे आयोजन केलेले आहे. यशस्वी स्पर्धकांना दैनंदिन मान्यवरांच्या उपस्थित रोख स्वरूपात किंवा सन्मानपत्र तसेच चषक देऊन गौरविले जात आहे.
पंचवटीत गरब्याची धूम; तरुणाईचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:34 AM