सायखेडा : शासनाद्वारे उज्वला योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्त्यांना शंभर रूपयांच्या सवलतीत माफक दरामध्ये उज्वला गॅस जोडणी दिली. परंतु याच गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. हा शंभरीतील गॅस आता नाका पेक्षा मोती जड वाटू लागला आहे.घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर या आठवड्यात आठशे पन्नास रुपयांवर जाऊन धडकले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून सिलिंडरसाठी एकत्रित रक्कम जमविताना या लॉकडाऊनमुळे रोजगार उपलब्ध नसल्याने पैसे जमविताना दमछाक होत आहे.
घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकाला मार्चपासून सबसिडी दिली जात नाही. गॅस सिलिंडर खरेदी वेळी पूर्ण रक्कम द्यावी लागते. अनेक वेळा सामान्य नागरिकाकडे एकत्र रक्कम नसते. मागील काही वर्षात शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणावर गॅस कनेक्शनधारकांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागात उज्ज्वला योजनेतून अनेकांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे दारिद्रयरेषेखालील नागरिकांकडे सुद्धा गॅसची सोय झाली. वृक्षतोड कमी व्हावी यासाठी सरकारने गॅस कनेक्शन सवलतीच्या दरात वाटले. परंतु गेल्या काही वर्षांत सातत्याने होणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमतीची दरवाढ सामान्यांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे.शासनाच्या नियमाप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडरसाठी अनुदान दिले जाते. ही सबसिडी म्हणजेच अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. परंतु मार्च पासून सबसिडी नाही आणि अनुदानही नाही. सिलिंडरसाठी बुकिंग केल्यानंतर सिलिंडर घेताना एकूण रक्कम ग्राहकांना जमा करावी लागते.
परंतु सर्वसाधारण कुटुंबातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणा-या व्यक्तिला एकाचवेळी ही रक्कम भरणे जड जात आहे. हळूहळू गॅसच्या दरातमध्ये सतत वाढ होताना दिसते. त्यामुळे गॅस कनेक्शन असूनही अनेक ग्राहकांना सिलिंडर खरेदी करणे शक्य होत नाही. पर्यायाने त्यांनी आपला मोर्चा पुन्हा कोळसा,चुल सरपणासारख्या इंधनाकडे वळविला आहे.चुली परत पेटल्या...गॅस सिलिंडरचे दर सतत वाढत चालले असून गृहिणींचे नियोजन कोलमडून गेले आहे. याचाच परिणाम ग्रामीण भागातील बंद केलेल्या चुली परत पेटल्या असुन महिलांना धुराच्या विळख्यात स्वयंपाक करण्याची पून्हा वेळ आली आहे.- भारती चव्हाण, सरपंच, औरंगपूर.